बदलत्या सामाजिक परिस्थितीत मानवी नातेसंबंधांमधील सलोखा कायम राखण्यासाठी अनेक जण आपापल्या दृष्टीने प्रयत्नशील असतात. हे नातेसंबंध केवळ जैविक असतील असं नाही, यामध्ये राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांचाही अंतर्भाव असतोच. देशाच्या समोरील मुख्य समस्यांमध्ये बेरोजगारी आणि दारिद्र्य यांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. अशावेळी 'कौशल्य' हा शब्द जडजंबाळ न वाटता, आवश्यक वाटेल तेव्हाच मूलभूत समस्येवर काम करणं शक्य होईल....
१) गावात / शहरांत शक्य त्या ठिकाणी "समता अभ्यास केंद्रा" ची स्थापना व्हावी. या केंद्राचा मूळ उद्देशच लोकांनी एकत्र यावं, वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तक, लेखांचं वाचन करावं, एकमेकांसोबत चर्चा करावी आणि त्यातून विषय समजून घ्यावं हा आहे. बौद्धिकदृष्ट्या सक्षम झालेले मेंदू कोणत्याही आमिषाला, भूलथापांना सहज बळी पडणार नाहीत. व्यवस्थेला प्रश्न विचारतील, आणि काही प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधण्याचा प्रयत्न करतील. या केंद्रामधूनच संविधानाचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम केलं जाईल. त्यायोगे संविधानाचा सरनामा वाचण्याचं काम शाळेपुरतं मर्यादित राहणार नाही तर ते गावातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचेल....
२) गावात अशाच पद्धतीने "लोक-मत केंद्र" स्थापन व्हावीत. याचं प्राथमिक स्वरूप हे ग्रामसभेसारखं राहील, जिथं लोक निर्भीडपणे आपलं मत व्यक्त करतील. सोबतच इतरांची मतंही ऐकून घेतील....
३) ग्रामप्रशासन किंवा लोकप्रशासन ही गोष्ट लोकांना भीतीदायक न वाटता आपुलकीची वाटायला हवीत. जनतेतून निवडून दिलेले लोकसेवक आणि सामान्य जनता यांच्यात संवाद व्हावा यासाठी "प्रतिनिधी-जनता हमी केंद्र" गावपातळीवर सक्रिय व्हायला हवं. महिन्यातून एकदा अशा प्रकारचा संवाद स्थानिक लोकशाही बळकट करायला हातभार लावेल.
४) लोकप्रतिनिधींचे जाहीरनामे हे फक्त निवडणुकांपुरते नसावेत. कमी कालावधीत पूर्ण करावयाची कामे आणि दीर्घ काळासाठी करावयाची कामे यांचं व्यवस्थित समीकरण प्रतिनिधींनी लोकांसमोर ठराविक काळाने ठेवायला हवं. त्यानुसार "जन-जाहीरनामा केंद्रा" ची अंमलबजावणी लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या पुढाकाराने करावी.
५) गावातील तंटामुक्ती पथकाची व्याप्ती वाढवून त्याचं रूपांतर "मित्रांगण कक्षा" मध्ये व्हावं. इथं केवळ भांडणं सोडवली जाणार नाहीत तर समुपदेशनही केलं जाईल. समुपदेशन आयुष्यात काय करता येईल याचं, दिशा भरकटू न देण्याचं, हरवलेला मार्ग शोधण्याचं आणि सोबतच एकमेकांच्या सहकार्याने पुढं जाण्याचं..!!
६) चांगला रोजगार हा फक्त मोठ्याच शहरांत उपलब्ध होतो, हे चित्र बदलण्यासाठी गावमध्येच "कौशल्य विकास कक्षा" ची स्थापना केली जावी. यामध्ये स्वतःच्या हिंमतीवर काही करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींना शेती आणि इतर जोडउद्योगांसमवेत, त्यांनी शिक्षण घेतलेल्या क्षेत्रातील घटकांवर काम करण्याची संधी मिळेल. अनेक प्रशिक्षण, मार्गदर्शन वर्ग त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतील.
७) ग्रामीण आणि शहरी भागांतील तरुण-तरुणींच्या लैंगिक जाणिवा अधिक प्रगल्भ करण्यासाठी, या विषयाबाबत त्यांच्या मनात असलेल्या विविध प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी "युवा स्पंदने" केंद्राद्वारे योग्यरितीने मार्गदर्शन करण्यात येईल.
८) "सामाजिक मनोविश्व केंद्र" उभारून महापुरुषांच्या शिकवणुकीचं योग्य अनुसरण करण्यासोबत पर्यावरण, नैसर्गिक आपत्ती याविषयी कराव्या लागणाऱ्या कृतीशील कार्यक्रमाची तयारी या ठिकाणी करता येईल. निसर्गाचा समतोल कायम राखण्यासोबतच महापुरुषांना विभागलेलं किंवा विखुरलेलं न ठेवता राजकीय आणि सामाजिक समतोल कायम राखण्याचं काम मनोविश्व केंद्रातर्फे करण्यात येईल...
विशेष संदेश -
सदर जाहीरनामा हा कुणी-कुणासाठी करायचा नसून लोकांनीच स्वतःच्या वृद्धीसाठी अंगीकारायचा आहे. महाराष्ट्रात सध्या पक्षांतराचा धुराळा सगळीकडे उडत आहे. येत्या काळातही अनेक निवडणूका येतील, आश्वासने मिळतील पण लोकांचाच भरवसा नसल्यावर त्या जाहिरनाम्यांना किंमत राहणार नाही. त्यामुळे सरकार कोणतंही असो, जाहीरनामा हा लोकांचाच असायला हवा..
पटतंय ना..??
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा..!!
-- प्रा. अमीर मुमताज सलीम इनामदार
-लेखक हे खंडाळा (बावडा) सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाचे सहायक प्राध्यापक आहेत. विवेकवाद, संविधानिक मूल्ये या विषयावर ते व्याख्यानही देतात....
संपर्क - 9834673418
ई-मेल-profamir2131@gmail.com
संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111