महात्मा फुले कृषि विद्यापीठात रब्बी व उन्हाळी हंगामासाठीची विभागीय बैठक संपन्न - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

22 October 2024

महात्मा फुले कृषि विद्यापीठात रब्बी व उन्हाळी हंगामासाठीची विभागीय बैठक संपन्न

 


पिकांचे विविधीकरण करणे गरजेचे - कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील


 प्रतिनिधी: जावेद शेख/ राहुरी 

रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणार्या विविध पिकांमुळे पिकांची फेरपालट होऊन जमिनीची प्रत सुधारते. त्यामुळे त्यापुढील हंगामात घेतल्या जाणार्या पिकांच्या उत्पादनात भर पडते. त्याचबरोबर चांगल्या पद्धतीची इकोसिस्टीम तयार करण्यासाठी तसेच अनुकूल पर्यावरण तयार होण्यासाठी पिकांचे विविधकरण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.  

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषि विद्यापीठात विभागीय कृषि संशोधन व विस्तार सल्लागार समिती बैठक रब्बी व उन्हाळी-२०२४ चे आयोजन हायब्रीड मोडमध्ये करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. यावेळी संशोधन संचालक श्री. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कृषि संचालक श्री. रफिक नाईकवडी, कोल्हापूरचे विभागीय कृषि सहसंचालक श्री. उमेश पाटील, नाशिकचे विभागीय कृषि सहसंचालक श्री. सुभाष काटकर, पुणे विभागीय कृषि सहसंचालक श्री दत्तात्रय गवसाने, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खडबडे व सहयोगी संशोधन संचालक डॉ. विजय शेलार उपस्थित होते.




आपल्या अध्यक्षीय भाषणात कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील पुढे म्हणाले की विद्यापीठाने शेतकर्यांसाठी संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीमध्ये यावर्षी ०६ वाण, ०५ अवजारे व ९२ पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशी दिल्या आहेत. तसेच विविध पिकांचे ११ वाण देशपातळीवर प्रसारित झालेले आहेत. ही बाब विद्यापीठासाठी भूषणावह आहे. ड्रोन प्रशिक्षण देणारे देशातील हे एकमेव विद्यापीठ आहे. पुणे येथे देशी गाईबाबत तीन महिन्यांचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. विद्यापीठ जैविक खते, जैविक औषधे व जैविक कीटकनाशकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करत असते. या उत्पादनांना कृषि विभागाने मोठ्या प्रमाणावर मागणी नोंदवावी जेणेकरून विद्यापीठाच्या महसुलात वाढ होईल असे यावेळी ते म्हणाले.

याप्रसंगी श्री. रफिक नाईकवडी म्हणाले की या वर्षी सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाला आहे. कृषि विभागाकडे खते तसेच बियाणे उपलब्धता चांगली आहे. भरपूर पाणी आहे, बियाणे उपलब्ध आहे तरी या गोष्टीचा फायदा उठवू या. विद्यापीठाचे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकर्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करु. यावेळी डॉ. विठ्ठल शिर्के यांनी संशोधन अहवालाचे सादरीकरण केले. संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाणे यांनी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण उपक्रमांचे सादरीकरण केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री सुगी रब्बी प्रकाशनाचे विमोचन करण्यात आले. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, नाशिक व पुणे कृषि विभागांचे कृषि सह-संचालक श्री. उमेश पाटील, श्री. सुभाष काटकर, श्री. दत्तात्रय गवसाने यांनी त्यांच्या विभागांचा अहवाल सादर केला. बैठकीदरम्यान डॉ. साताप्पा खरबडे यांनी हुमणीच्या नियंत्रणाबाबत, डॉ. सचिन नलावडे यांनी ड्रोनद्वारे करावयाच्या फवारणीसाठी औषधांच्या प्रमाणाबाबत, डॉ. विजू अमोलिक यांनी ज्वारी, ऊस व मका पिकांविषयीचे प्रश्न, डॉ. बी.टी. पाटील यांनी कांदा, आंबा, द्राक्ष व केळी याविषयी, डॉ. अण्णासाहेब नवले यांनी द्राक्ष, हळद, आले व केळी या पिकांविषयी, डॉ. नितीन दानवले यांनी करडई पिकाच्या बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत, डॉ. उत्तम कदम यांनी ज्वारी पिकाच्या किडीबाबत, डॉ. मनोज माळी यांनी हळद व आले पिकांबाबत, डॉ. अनिल दुरगुडे यांनी नॅनो युरिया व नॅनो डीएपी तसेच खतांच्या वापराविषयी, डॉ. सुनील कराड यांनी मका पिकाविषयी, डॉ. उल्हास सुर्वे यांनी सोयाबीन, कांदा, पेरू, सिताफळ, आंबा, हळद व तूर या पिकावरील माहिती विषयी, डॉ. कैलास भोईटे यांनी क्षारपड जमिनीवर येणार्या उस वाणांची माहिती या विविध विषयांवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. पवन कुलवाल यांनी उझबेगीस्थान येथील ताश्कंद येथे झालेल्या जागतिक कपाशी संशोधन कॉन्फरन्समध्ये झालेल्या सादरीकरणाबाबतची तसेच त्या परिसरात कपाशीवरील होत असलेल्या संशोधनाबाबतची माहिती दिली.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. विजय शेलार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख यांनी तर आभार डॉ. गोकुळ वामन यांनी मानले. या बैठकीस विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता, कृषि सह-संचालक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, उप-विभागीय कृषि अधिकारी, विद्यापीठ शास्त्रज्ञ व कृषि विभागाचे अधिकारी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने उपस्थित होते.

संकलन

समता न्यूज सर्व्हिसेस,

श्रीरामपूर - ९५६११७४१११

LightBlog

Pages