सह्याद्रीच्या कुशीतील निसर्गसमृद्ध आंबी खालसा- डॉ.शरद दुधाट - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

24 October 2024

सह्याद्रीच्या कुशीतील निसर्गसमृद्ध आंबी खालसा- डॉ.शरद दुधाट


शौकतभाई शेख / श्रीरामपूर 

अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा हे कृषिप्रधान आणि निसर्गसंपन्न गाव. निसर्गसमृद्धता आणि निसर्गप्रेमींमुळे या गावाकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नाशिक-पुणे राष्ट्रीय राजमार्ग एन. एच. ६० संगमनेर पासून ४० किलोमीटर अंतरावर. हायवेपासून संगमनेर कडून उजव्या हाताला आणि आळेफाट्याकडून डाव्या हाताला दोन किलोमीटर अंतरावरील गाव. जवळून वाहणारी मुळा नदी. गावालगत नदीवर तुडुंब भरलेला बंधारा, बंधाऱ्याच्या फळ्यांवरून कोसळणारे आणि फेसाळलेले, झेपावणारे शुद्ध पाणी. दूरपर्यंतचा मागे फुगलेला पाण्याचा भाग. प्रदूषणाचा थोडाही लवलेश नाही. गावालगत बंधाऱ्याजवळ शंकराचे मंदिर. एकूणच सर्व काही निसर्गमय.  गावातील निसर्ग वेड्याप्रेमींनी आपल्या पर्यावरण व वृक्षसंवर्धन विचारातून फुलवलेले छानसे 'नक्षत्रवन'. आंबी खालसा लगत बोरवणवाडी (तीन), घारगाव (चार), डोळासने (सहा), कुरकुंडी (सहा), सारोळे पठार (सहा) ही निसर्ग व कृषी प्रधान गावे काही अंतरावरील. २०११ च्या जनगणनेनुसार ३३०५ इतकी या गावाची लोकसंख्या. प्राथमिक शाळा, सरकारी कार्यालय खूपच नीटनेटकी. गावापासून तीन किलोमीटर अंतरावरील जोठेवाडीचा सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील एक हिरवागार नटलेला डोंगर. इतरही काही अंतरावरील हिरवीगार डोंगर. सर्वांचे लक्ष वेधून घेणारे डोंगरालगतचे विरभद्र देवालय. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाचे राज्यसंघटक बाळासाहेब गाडेकर, सरपंच बाळासाहेब ढोले ही या गावचे निसर्गप्रेमी सुपूत्र. बाळासाहेब गाडेकर यांच्या जोठेवाडी आणि शेतीलगत डोंगराच्या कुशीत अलगदपणे १२० फुटांवरून अवकाशातून जमिनीकडे झेपावणारा विरभद्र धबधबा सर्वांचे लक्ष वेधून घेतो. हा धबधबा आणि निसर्गमय परिसर अप्रतिम सौंदर्याने नटलेला असा, जणू सह्याद्रीच्या डोंगर रांगेत दडून ठेवलेला हा निसर्गाचा खजिनाच; परंतु या खजिन्यावर अजून कोणाची नजर गेलेली नाही. गावकरी वगळता हा धबधबा व हा निसर्ग परिसर फारसा कुणाला माहीत नाही. भावी काळामध्ये मात्र खूप चांगले पर्यटन क्षेत्र होऊ शकेल; पण पर्यटन क्षेत्र आले की तिथला निसर्ग, तिथली शांतता ही मात्र ढवळली जाणार.


वृक्षमित्र स्व. आबासाहेब मोरे व स्व. सुभाष मोरे यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात कार्यरत असलेले निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळ प्रमोददादा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण व वृक्षसंवर्धनाचे उत्तम कार्य करीत आहे. आंबी खालसा या गावातील पर्यावरण व वृक्षसंवर्धन हा त्याचाच एक भाग. या गावातील तरुण कर्तबगार निसर्गप्रेमी कार्यकर्ते सरपंच बाळासाहेब ढोले व बाळासाहेब गाडेकर याच विचार-भावनेतून तन-मन-धनाने या कार्याला जोडले गेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली या गावात वृक्षसंवर्धनाचे मोठे कार्य झाले आहे. मुळा नदीच्या काठावर गावालगत प्रमोददादा मोरे यांच्या विचार-विनिमयातून या गावात 'नक्षत्रवन' साकारले आहे. सर्वांनी एकत्र येऊन नक्षत्रवनाची केलेली निर्मिती हा या गावाचा आदर्श. 

याच निसर्गप्रेमींच्या सहकार्याने रविवार, दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी आंबी खालसाच्या जोठेवाडी जवळचा विरभद्र धबधबा पाहण्याचा अप्रतिम योग जुळून आला. बाळासाहेब गाडेकर यांच्या वस्ती आणि शेतीलगतचा हा विरभद्र धबधबा. निसर्ग व पर्यावरण मंडळाची ही एक वनसहल. अध्यक्ष प्रमोददादा मोरे, मीनाताई मोरे, त्यांची मुले, कार्याध्यक्ष छायाताई राजपूत, उपाध्यक्ष प्रकाश केदारी, सरपंच बाळासाहेब ढोले, बाळासाहेब गाडेकर, बाळासाहेब डोंगरे, राज्यसंघटक डॉ. शरद दुधाट, चंद्रकांत भोजने, वंदना भोजने, संजय गायकवाड, जालिंदर आहेर, तुकाराम जाधव, सुंदरदास करांडे, संदीप कुंभारे, निसर्गप्रेमी ग्रामस्थ दीपक ढमढेरे, उद्योजक ज्ञानेश्वर कहाने या सर्वांचा या वनसहलीतील उत्साह ओसंडून वाहत होता. दुपारच्या एक-दीडच्या सुमारास वनसहलीला सुरुवात झाली. रस्त्यालगत केळी, डाळिंब, सीताफळाच्या बागा, नंतर पुढे झेंडूच्या फुलांची शेती. एकीकडे डोंगराचा भाग तर दुसरीकडे लगतची पायवाट. बाळासाहेब गाडेकरांची सोनेरी सीताफळांची अप्रतिम फलधारण केलेली बाग. तिथून पुढचा रस्ता मात्र पूर्ण जंगलाचा. रस्त्यावरील घाणेरीच्या जाळीतून वाकून पुढे जाताना त्या जाळीची भव्यता ध्यानात यायची, भीती पण वाटायची. सरपटणारे प्राणी व बिबट्या यासारख्या प्राण्यांची पण मधून मधून भीती वाटायची. कधी एकदम खाली उतरणीचा भाग तर कधी एकदम चढणीचा भाग. डोंगरातील झऱ्यांचे खळाळत्या पाण्याच्या आवाजाने कानावर मधुर स्पंदने निर्माण होत. झाडीतील रस्ता, तर कधी कमरेपर्यंत वाढलेल्या गवतातील रस्ता, कधी झऱ्यांच्या पाण्यातून स्वतःचा तोल सांभाळत पुढे जाणारा रस्ता, हा अनोखा अनुभव घेण्यात गप्पा, चर्चा करण्यात सर्वजण अगदी मग्न. साधारण वनसफरीचा हा एक किलोमीटरचा अंतराचा भाग. अखेर झऱ्याच्या पाण्यातून चालत गेल्यानंतर समोर दृष्टीस पडतो तो जवळपास १२० फुटांवरून झेपावणारा धबधबा. धबधब्याच्या तुषारांनी सर्व परिसर थंडगार असा.  प्रत्येक जण या अप्रतिम निसर्गाचा आनंद घेण्यात अगदी मंत्रमुग्ध. ठिकठिकाणचे फोटो सेशन. संजय गायकवाड सरांचे धबधब्याखाली पाण्यातील स्नान. ऊन सावल्यांचा खेळ. ऊन पडले की पाण्याच्या दवबिंदूवर धबधब्याच्या पायथ्याशी निर्माण झालेले इंद्रधनुचे सप्तरंग मनाला मोहिनी घालीत. झऱ्याच्या पाण्याचा तो खळखळ आवाज, झऱ्यावर काही ठिकाणी आडवी झालेली लाकडाची ओंडकी. ओंडक्यावर विराजमान झालेले प्रकाश केदारी जणू अश्वावर आरुढ झाले असे. थंडगार वातावरणात बाळासाहेब गाडेकर यांनी भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा व गूळ, स्वबागेतील मोठमोठ्या पेरूंच्या कापलेल्या मीठ, मिरची लावलेल्या फोडी, स्वतःच्या शेतातील मक्याची उकडलेली मीठ, मिरची व लिंबू लावलेली टिपभर गरमागरम कणसे यांनी सर्वांचेच मन व पोट भरून गेले. आज एवढे सगळे आठवले तरी तोंडाला पाणी येते. एकीकडे मनमोहीत करणारे वातावरण तर दुसरीकडे जिभेवर आंबट, गोड, तिखट याची अप्रतिम चव. असा हा रानमेवा नाश्ता. जेवणाचा विसर पडणारा होता. दृष्टीला सुखावणारा धबधबा आणि अप्रतिम अल्पोपहार यांनी सर्वजण भारावून गेले. या ठिकाणाहून मन निघेनासे होईना; परंतु या परिसरात लवकरच अगदी चार वाजता काळोख दाटून आलेला. शेवटी सर्वांनी एकत्र येऊन निसर्ग व पर्यावरण मंडळ, निसर्गक्षेत्र आंबी खालसा असा हात वर करून अनेकवेळा जयघोष केला. जय जवान.... हसतमुखाने नारा देणारे सरपंच बाळासाहेब यांच्या जयघोषाने एकच हास्यमय वातावरण निर्माण झाले. तसे म्हटले तर प्रमोददादांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेली ही पहिलीच वनसहल; परंतु खूपच मनाला सुखावणारी.


 प्रमोददादांचा प्रेमळ, मनमिळावू स्वभाव सर्वांना आपलेसा करणारा, छायाताई राजपूत या सर्वांच्या आईच. अतिशय प्रेमाने, जिव्हाळ्याने सर्वांशी मनापासून चौकशी करणाऱ्या. जणू काही निसर्ग पर्यावरण मंडळाचे एक कुटुंबच. परतीच्या प्रवासाची ओढ. विरभद्र मंदिरातील निसर्ग व पर्यावरण मंडळाचा स्नेहमेळावा. या मेळाव्यातील अनेक कार्यकर्त्यांच्या कार्याच्या आठवणी, कुणाचे गोड कौतुक तर भाषणातून पोहोचणारा पर्यावरण व वृक्षसंवर्धनाचा संदेश. मंदिराच्या परिसरातील प्रमोददादा मोरे व सर्वांच्या साक्षीने केलेल्या उंबराच्या रोपाचे रोपण या वनसहल व स्नेहीमेळाव्याची कायम आठवण स्मरणात राहणारी अशी. रसमय आणि गोड असा बाळासाहेब गाडेकर यांच्या वस्तीवरील वनसहलीचा जेवणाचा अनोखा बेत. सर्वांना आवडणारा मेनू गरमागरम झणझणीत पिठले, बाजरीच्या भाकरी, कांदा, चटणी, पापड, काकडी या देशी जेवणाने, पाहुणचाराने पोट आणि मन खूपच भरून गेले. बाळासाहेब व कुटुंबीयांची सर्वांची धावपळ, त्यांची अतिथ्यशिलता वाखाणण्याजोगी. बाळासाहेबांचा प्रत्येक कामासाठीचा पुढाकार मनाला खूपच भावणारा असा. खऱ्या अर्थाने हे गाव येथील दोन्ही बाळासाहेब, दीपक, ज्ञानेश्वर यांचे वृक्षसंवर्धना प्रतीचे कार्य आदर्शवत आणि प्रेरणादायी असे. एरवी सरपंच मंडळी राजकारणात गुंतलेली असतात; परंतु बाळासाहेब ढोले हे मात्र शिखराच्या उंचीचे व्यक्तिमत्व असूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत. पर्यावरणाच्या कामासाठी ही मंडळी तन-मन-धनाने नेहमी अग्रेसर आहेत. आज काहींकडे पैसा आहे तर सुचत नाही, काही कडे पैसा नाही, सुचूनही उपयोग होत नाही. इथे मात्र आवड , निवड आणि सवड या तिन्हींचा सुरेख संगम या दोन्ही बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वात आणि कार्यात झालेला आहे. वनसहल आणि स्नेहमेळाव्यासाठी आंबी खालसा निसर्गप्रेमींनी घेतलेले परिश्रम आणि अविस्मरणीय वनसहल सर्वांच्या कायमची स्मरणात राहणारी आहे.

डॉ. शरद दुधाट 

राज्यसंघटक

निसर्ग पर्यावरण मंडळ, महाराष्ट्र राज्य

संकलन

समता न्यूज सर्व्हिसेस,

श्रीरामपूर - 9561174111

 

LightBlog

Pages