सातारा / प्रतिनिधी:
‘’कर्मवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत कर्मवीरांच्या नावाने हे विद्यापीठ झाल्याने त्यांचे स्वप्न आता उशिरा का होईना पूर्ण झाले आहे.. कर्मवीर विद्यापीठातील तीनही कॉलेजमधील विद्यार्थी कला ,क्रीडा व व शैक्षणिक गुणवत्तेत नेहमीच पुढे आहेत. हे विदयापीठ नवीन असले तरी ते लवकरच नावारुपाला येईल. सायन्स कॉलेजचे नुकतेच मुल्यांकन झाले आहे. त्याचा निकाल आल्यानंतर ते महाराष्ट्रात हायेस्ट असेल. यशस्वी विद्यार्थ्यामुळेच विद्यापीठाचा मानसन्मान वाढत असतो. सर्वच विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनियर होता येत नाही म्हणून विद्यार्थ्यानी आवडीप्रमाणे करियरची निवड करून टॉपचे यश मिळवले पाहिजे. युवा महोत्सवात पहिला ,दुसरा नंबर येण्याची मनीषा न बाळगता अतिशय चांगली सादरीकरण करावे. युवा महोत्सवातून नेतृत्व करण्याची संधी मिळते. लोककलेत अनेक विद्यार्थी सहभागी होतात. मला सातारा येथे राहतो याचा अभिमान आहे. निसर्गसंपदा आहे. सर्वात जास्त शुटींग सातारा जिल्ह्यात चालू असते. लागीर झाले जी,पारू या सारख्या मालिका याच परिसारत तयार झाल्या.या मालिकेत जायची संधी कलावंताना नक्की मिळेल. युवा महोत्सवात धाडस निर्माण व्हावे .युवा महोत्सव ही एक संधी आहे तिचा फायदा घ्यावा. कलेच्या क्षेत्रात काम करायचे असेल तर चांगले गुरु करा, अफाट कष्ट तयार करावे लागेल’’ असे मत सदगुरु गाडगे महाराज कॉलेज कराडचे प्राचार्य डॉ.मोहन राजमाने यांनी व्यक्त केले .ते कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या द्वितीय महोत्सवाचे उद्घाटन करताना छत्रपती शिवाजी कोलेज मध्ये प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के हे उपस्थित होते .यावेळी अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत काम करणारे अभिनेते संतोष पाटील, सिंधुताई सपकाळ यांचे चिरंजीव अरुण सपकाळ,विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा.डॉ.विजय कुंभार, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्राचार्य डॉ.बी.टी.जाधव, रयत शिक्षण संस्थेच्या ऑडीट विभागाचे सहसचिव डॉ.राजेंद्र मोरे, डी.जी. कॉलेजचे प्राचार्य डॉ.व्ही.के सावंत,विद्यार्थी विकास मंडळाच्या डॉ.मनीषा पाटील ,सांस्कृतिक समन्वयक राजेंद्र संकपाळ , विद्यापीठाच्या विविध विभागाचे अधिष्ठाता डॉ.अनिलकुमार वावरे,प्रा.डॉ. आर.आर. साळुंखे, डॉ.डी.डी.नामदास, डॉ.धनाजी जाधव,डॉ. महानवर,प्रा. डॉ.सुभाष वाघमारे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभिनेते संतोष पाटील म्हणाले ‘मी याच कॉलेजचा विद्यार्थी असल्याने २५ वर्षापूर्वी चे दिवस आठवून माझे मन गलबलून गेले आहे. कलावंत म्हणजे एक जबाबदारीचे भान ठेवावे लागते. जेंव्हा जेंव्हा कलाकृती करतो तेंव्हा एक नैतिक भान आपल्याला असायला हवे. या युवा महोत्सवाचा वापर करताना कलावंताने समाजातल्या घटनांचा अभ्यास करावा लागतो. समाजात आपले आदर्श राहिलेत का ? आदर्शाचे अनुकरण करा पण वाईट गोष्टीवर भाष्य करा,तिला विरोध करा. पथनाट्य करताना ज्या सामाजिक जाणीव आपण घेतली पाहिजे .कलेचा अर्थ समजून घेतला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे गणित असते,पण आपले वैचारिक अधिष्ठान आपण सोडत नाही. युवा महोत्सव आणखी जोशाने हवेत.मला असे जाणवले कि, कलावंताना व्यक्त व्हायचे असते पण त्यांना माध्यम कळत नाही , म्हणून प्रशिक्षणाची गरज असते. प्रेक्षकांनी देखील मनातल्या प्रतिक्रिया देणे आवश्यक असते. त्यातून कलावंतास प्रोत्साहन मिळत असते. माध्यमाचे भान समजून घ्या. कंपन्या तुम्हाला कुठेही नेतील पण तुम्ही वाहून जाऊ नका. तुमची सदसद विवेक बुद्धी तुम्ही जागृत ठेवली पाहिजे.रतन टाटा यांना पैसा मिळविण्यात आनंद मिळाला नाही.पद मिळाले तरी आनंद मिळाला नाही.अनेक कंपन्या विकत घेतल्या तरी आनंद मिळाला नाही..पण २०० व्हील चेअर अपंग व्यक्तींना वाटप केल्या .अपंग व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्यांना आनंद मिळाला . रतन टाटाची संवेदनशीलता समजून घेतली पाहिजे .कलाकाराने कला सादर केल्यानंतर त्याला प्रतिक्रिया द्यायला सुचले पाहिजे .आपल्या हितासाठी काम करणाऱ्या प्राध्यापकांचा मान राखा असेही आवाहन त्यांनी केली. मला मोठे व्यक्ती न समजता विद्यार्थी समजा अशी कृतज्ञता व्यक्त करून
समाजाचे चेहरा बदलण्याचे काम कलावंताने केले पाहिजे असे ते शेवटी म्हणाले.
सिंधुताई सपकाळ यांचे चिरंजीव अरुण सपकाळ यांनी तुकडोजी महाराज यांचे विचार यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. सिंधुताई यांनी चिखलदारा येथे पहिला आश्रम सुरु केल्याचे सांगून मी सिंधुताई यांचा मुलगा असलो तरी कधीही प्रसिद्धीच्या झोतात न राहता काम करत राहिलो. ३५० मुलांना आम्ही सांभाळत आहोत. माई अचानक गेल्याने कसेबसे सावरून आम्ही काम करीत आहोत .घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसांनी ही कविता त्यांनी सादर केली. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील तिन्ही कॉलेजकडून प्रत्येकी ११ हजार प्रमाणे ३३ हजार रुपयाची देणगी यावेळी अनाथ आश्रमासाठी देण्यात आली.
कुलगुरू प्रा.डॉ.ज्ञानदेव म्हस्के अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की ‘विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होण्यासाठी त्यांना कलेची आवश्यकता आहे. रयतेचा केंद्रबिंदू हा कधीही विद्यार्थीच राहिला आहे. विद्यार्थ्यांच्या इच्छा आणि आकांक्षा फलद्रूप होण्यासाठी आपण युवा महोत्सवाचे काम करतो. विद्यार्थ्यांनी सदर केलेली कला अबोध ,दुर्बोध असू नये तर सुबोध असावे, सळसळती तरुणाई ही रचनात्मक काम करण्यासाठी असावी. सळसळणे हे सापाचे देखील असते, पण विधायक कृती करण्यासाठी विद्यार्थ्यांची सळसळ असायला हवी असे ते म्हणाले. विदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अनेक अनुयायी आहे. ग्रामगीता त्यांनी लिहिली असली तरी ऐहिक गरजांची पूर्तता महत्वाची आहे. सिंधुताई यांच्याकडून नाळ तोडण्याचा प्रसंग ऐकतांना करूणआणि बीभत्स रस मनात निर्माण केला . माई यांनी तरुणांच्या पुढे देखील पदर घेऊन दाखवला होता .बहुआविष्कार त्या करीत होत्या ,समयोचित बोलत होत्या असेही ते म्हणाले.
या युवा महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी प्रथम प्रास्ताविक डॉ. मनीषा पाटील यांनी व्यक्त केले.प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांचा परिचय प्रा.डॉ. रोशनआरा शेख यांनी करून दिला. युवा महोत्सवाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. शेवटी प्रा. डॉ.रामराजे माने देशमुख यांनी मानले. सूत्र संचालन प्रा.राजेंद्र तांबिले व डॉ.विद्या नावडकर यांनी केले. या समारंभास विद्यार्थी , प्राध्यापक मोठ्या संख्येने हजर होते.
संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
---------------------------------------
फोटो कॅप्शन बॉक्स- १
सातारा - कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठात दीप प्रज्वलन करून युवा महोत्सवाचे उदघाटन करताना प्राचार्य डॉ.मोहन राजमाने समवेत इतर मान्यवर
---------------------------------------
फोटो कॅप्शन बॉक्स - २
सातारा - प्राचार्य डॉ.मोहन राजमाने युवा महोत्सवात कलावंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना समवेत इतर मान्यवर
--------------------------------------