श्रीरामपूर / प्रतिनिधी:
भारताची सौंदर्यवती कु. रश्मी शिंदे आज टोकियो जपानला मिस इंटरनॅशनल २०२४ या सौंदर्य स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रवाना झाली आहे. मिस इंटरनॅशनल इंडिया २०२४ चा किताब जिंकून कु.रश्मी शिंदे १४० कोटी भारतवासियांचे प्रतिनिधित्व करत मिस इंटरनॅशनल स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारताला विजेतेपद मिळवून देण्यासाठी सज्ज झाली आहे.
मिस इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धेच्या इतिहासात आज पर्यंत भारताला कधीही विजेतेपदाला गवसनी घालता आलेली नाही .मात्र मिस इंटरनॅशनल २०२४ ची स्पर्धा संपूर्ण भारतासाठी एक सुवर्णसंधी म्हणून उभी ठाकली आहे, कारण स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच रश्मी शिंदेच्या रूपाने एका अत्यंत प्रतिभावान आणि सर्व अर्थाने पात्र अशी स्पर्धक भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.
कु.रश्मी शिंदे हिने मुंबई विद्यापीठाच्या व्हीजेटीआय महाविद्यालयातून बी टेक ची पदवी संपादित केली आहे .तिने आजवर अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये विजय मिळवलेला असून ती एक उत्कृष्ट बास्केटबॉल तसेच निष्णात स्केटर खेळाडू आहे. तसेच कथ्थक या शास्त्रीय नृत्य प्रकारात तिने प्राविण्य मिळवलेले आहे. तिचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषांवर विलक्षण प्रभुत्व असून,तिला उत्कृष्ट वक्तृत्वाची देणगी ही लाभलेली आहे.
कु.रश्मी हीने आपल्या आई सोबत म्हणजेच श्रीरामपूरच्या सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.प्रेरणा शिंदे यांच्या सहयोगाने 'प्रेरणा फाउंडेशन' या समाजसेवी संस्थेची स्थापना केली असून,या संस्थेमार्फत विविध समाजसेवी उपक्रम सातत्याने राबवले जातात . या संस्थेच्या माध्यमातून आज गरीब घरातील ६० मुलींच्या इंग्रजी माध्यमातील शिक्षणाची जबाबदारी घेण्यात आलेली आहे .
कु.रश्मी शिंदे हीच्या रूपाने प्रथमच सक्षम प्रतिनिधित्व भारताला मिळाले असल्यामुळे संपूर्ण देशात अतिशय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विलक्षण सौंदर्य , कुशाग्र बुद्धिमत्ता आणि उच्चविद्याविभूषित असलेल्या रश्मी कडून सबंध भारत वासियांना विजयाची आशा निर्माण झाली आहे. मात्र ही नामांकित स्पर्धा जिंकण्यासाठी रश्मी हीस देशवासीयांच्या सदिच्छांची आणि भक्कम पाठिंब्याची गरज आहे. यासाठी देशवासियांनी मिस इंटरनॅशनलचे अधिकृत ॲप डाऊनलोड करून त्याद्वारे आपले एक बहुमूल्य मत रश्मी हीस द्यावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत इतिहास रचण्याची सुवर्णसंधी भारतवासीयांसमोर उभी असल्याने कु.रश्मीच्या विजयासाठी आणि भारताच्या सन्मानासाठी सर्व भारत वासियांनी मतदान करून आपल्या लाडक्या कन्येला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
वृत्त विशेष सहयोग
शंकर बाहुले - श्रीरामपूर
संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११