अहिल्यानगर / प्रतिनिधी:
बालकांना भारतीय सण, संस्कृतीचे महत्त्व लक्षात येण्यासाठी राबवलेला दीपोत्सव उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असून बालकांच्या तन,मनाची मशागत करण्याचे काम वॉरियर्स फाउंडेशन करत आहे, ही अतिशय प्रेरणादायी गोष्ट आहे असे प्रतिपादन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोभे यांनी व्यक्त केले.
वॉरियर्स एज्युकेशन सेंटर अँड प्री प्रायमरी स्कूल, कॉटेज कॉर्नर येथे आयोजित दीपोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालिका शर्मिला गोसावी या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून बजाज चे प्रशिक्षक नंदकुमार काळे हे होते.
पुढे बोलताना राजेंद्र चोभे म्हणाले की, या परिसरातील छोट्या बालकांसाठी वॉरियर्सच्या माध्यमातून सुरू झालेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असून लहान मुलांच्या मानसशास्त्राचा विचार करून त्या पद्धतीने विविध सण, उत्सव साजरे करण्यात येतात. अभ्यासासोबतच इतर सांस्कृतिक उपक्रम राबवून महनीय व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथी साज-या केल्या जातात, ही बालकांवर संस्कार करण्याची निरंतर प्रक्रिया प्रेरणादायी आहे.
नंदकुमार काळे आपल्या मनोगतात बोलताना म्हणाले की, मुलांच्या मनाचा कल लक्षात घेऊन त्यांना त्या प्रमाणात, त्या त्या प्रकारचे शिक्षण उपलब्ध करून दिल्यास सर्वांगीण विकास होऊ शकतो. त्यासाठी वॉरियर्सने पुढाकार घेतल्यास आपण निश्चितच सहकार्य करू,असे आश्वासन त्यांनी दिले.
संचालिका शर्मिला गोसावी यांनी वॉरियर्सच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. छोट्या बालकांनीही फटाके फोडून दिवाळीचा आनंद व्यक्त केला, छत्रपती शिवरायांच्या राजगडाची प्रतिकृती यावेळी उभारण्यात आली होती. विविध वेषभूषेतील बालकांनी दीपावली दीपोत्सवाचा आनंद घेतला. यावेळी श्रुतिका घोडेस्वार,व वर्षा गुजर, संगीता गोसावी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११