“कॉ. शरद पाटील यांचा धर्मविचार” याविषयावर छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे विशेष व्याख्यान संपन्न - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

28 October 2024

“कॉ. शरद पाटील यांचा धर्मविचार” याविषयावर छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे विशेष व्याख्यान संपन्न


सातारा / प्रतिनिधी:

येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे  घटक महाविद्यालय छत्रपती शिवाजी कॉलेजच्या इतिहास विभाग आणि अमरावती यथील समाज विज्ञान प्रगत अध्ययन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने (सामंजस्य कराराअंतर्गत) शुक्रवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२४ रोजी कॉ. शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कॉ. शरद पाटील यांचा धर्मविचार या विषयावर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील विमेन्स स्टडीज सेंटर येथील डॉ. भगवान फाळके यांचे ऑनलाईन विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 


आपल्या व्याख्यानात त्यांनी नमूद केले की, कॉ. शरद पाटील यांच्या विचारांच्या केंद्रस्थानी भारतीय समाजक्रांतीचा प्रश्न आहे. त्यामुळे स्वाभाविकच त्यांचे धर्मविचारही त्यादृष्टीने व्यक्त झाले आहेत. भारतीय समाजक्रांतीच्या अनन्यतेचा शोध घेताना त्यांनी भारतीय ऐतिहासिक भौतिकवादाची मांडणी केली. त्यामध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळातील सामाजिक संरचनेच्या बदलत्या स्वरूपाची एक संगती मांडली. यामध्ये विविध धर्म, पंथ आणि त्यांची तत्त्वज्ञाने यांच्या जडणघडणीचा विचार मांडला. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळात तसेच स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील धर्माच्या बदलत्या संदर्भाचीही त्यांनी मांडणी केली आहे. समाजविकासक्रमाच्या विकास प्रक्रियेत धर्माला बघणे हे तर त्यांचे वैशिष्ट्य आहेच पण त्याही पलीकडे जाऊन ते त्याला बहुप्रवाही अन्वेषण पद्धतीने आणि विधायक अब्राह्मणी दृष्टीने बघतात. त्यामुळे धर्माबाबत सनातनी भूमिका घेणाऱ्या व्यक्तींच्या आणि पुरोगामी भूमिकेतून धर्माकडे बघणाऱ्या व्यक्तींच्या मूळ धारणांना त्यांची मांडणी ही छेद देणारी जाणवते. 

कॉ. शरद पाटील यांनी बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादाच्या अन्वेषण पद्धतीने धर्माच्या उदयविकासामागील सामाजिक-संघर्षाची उकल केली आहे. भारतातील सामाजिक संघर्ष हा ब्राह्मणी आणि अब्राह्मणी विचारपरंपरांमधील आहे. भारतातील धर्माच्या उदयविकासातही या दोन परंपरा कार्यरत राहिलेल्या आहेत. ब्राह्मण आणि अब्राह्मण अशा विभागणीच्या आधारे घडणारी मांडणी ही ब्राह्मण द्वेषातून करण्यात येत नसून ती वैदिक साहित्यातील 'ऐतरेय ब्राह्मण' पासूनच चालत आली आहे. अशा मांडणीला जातीच्या संदर्भात न बघता दोन वैचारिक परंपरांच्या संदर्भात बघणे आवश्यक असल्याचे कॉ. पाटील यांचे मत आहे. ही बाब दर्शवून धर्म, विविध पंथ आणि तत्त्वज्ञाने यांच्यात असलेल्या ब्राह्मणी आणि अब्राह्मणी संघर्षांला त्यांनी आपल्या मांडणीतून अधोरेखित केले असल्याचे डॉ. फाळके पुढे नमूद करतात. 

कॉ. शरद पाटील यांनी प्राचीन काळातील वर्णव्यवस्थात्मक समाजाविषयी, मध्ययुगीन काळातील जातिव्यवस्थात्मक समाजाविषयी आणि आधुनिक काळातील जातवर्ग समाजाविषयी काही महत्त्वाच्या बाबींची चर्चा केली आहे. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळाची वैशिष्ट्यपूर्णतः तसेच त्यातील बुद्धाच्या कार्याचे योगदान त्यांनी दर्शविले आहे. बुद्धाने आपल्या तत्त्वज्ञानाच्या आधारे वर्णव्यवस्थाअंताची क्रांती केली. त्यातूनच पुढे जातिव्यवस्थात्मक समाज विकसित झाला. आणि ब्रिटिश आगमनानंतर जातवर्गीय समाज अस्तिवात आला. जातिव्यवस्थाअंताची क्रांती अद्याप झालेली नाही. तिची आज आवश्यकता आहे. वर्तमान काळात बदलत्या उत्पादन संबंधानुसार व बदलत्या सामाजिक संघर्षानुसार अद्ययावत स्वरुपाची मांडणी करणे गरजेचे असल्याचे कॉ. पाटील यांची मांडणी दर्शविते. भारतातील धर्माचा उदय आणि त्यांचा विकास होण्यामागे प्रेरक असणारी सामाजिक संघर्षाची  परिस्थिती कॉ. शरद पाटील यांनी मांडली आहे. 

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मनोहर निकम यांनी करून दिला. अध्यक्षीय मनोगत इतिहास विभागप्रमुख प्रो. डॉ. धनाजी मासाळ यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. कबीर वाघमारे यांनी मानले डॉ. एम. डी. चिंदे यांनी सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम घेण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी प्रोत्साहन दिले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इतिहास विभागातील डॉ. विकास येलमार, डॉ. डी. डी. कोरडे , प्रा. शरद ठोकळे, डॉ. सीमा कदम, डॉ. आर. जे. लोखंडे, प्रा. निलेश जमदाडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात विशेष सहकार्य केले. यावेळी कार्यक्रमात महाराष्ट्रातील आणि कर्नाटकमधील विविध मान्यवर, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

 

LightBlog

Pages