दिपावली - सण दिव्यांचा, सण आनंदाचा, सण उत्साहाचा.
दिवाळी म्हणजे सर्व काही नव - नवनवीन. अगदी आंघोळीचा साबण, सुवासिक तेल, सुगंधी उटणे, नवीन कपडे, नव - नवीन आकर्षक पणत्या, आकाशकंदील, दारावर रंगीबेरंगी सुशोभित तोरणे, भल्या मोठ्या रांगोळ्या, फटाक्यांची आतषबाजी, चवदार फराळ. वा ऽऽऽऽऽ दिवाळीत नुसता झगमगाटच.
अभ्यंगस्नान करून नवी वस्त्रे परिधान करून लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करायचे, पाडव्याला दारी तोरणं लावून जावयास गोडधोड पाडवा जेवण जेवू घालायचे. बहीण - भावाने हसत खेळत भाऊबीज साजरी करायची. सर्वांनी मिळून फराळाचा आस्वाद घ्यायचा. एकत्र फिरायला जायचे. किती मज्जा ना!
पण; हे दृश्य सर्वत्र पाहावयास मिळते का? म्हणजे काय? दिवाळी तर सर्वजण साजरी करतात
पण असे दृश्य काही ठिकाणीच पाहावयास मिळते.मध्यमवर्ग ते उच्चभ्रू वर्गापर्यंतच. गरीब कामगार कुटुंबांमध्ये असे होत नाही. याचा अर्थ असा नाही की, ते दिवाळी साजरी करत नाहीत.
करतात ना! तेही दिवाळी साजरी करतात. पण; खूप फरक आहे हो गरीबांच्या दिवाळीत. दिवाळीला इतरांच्या घरी पाडव्यापर्यंत फराळाचे पदार्थ निम्मे खाऊन संपतात, पण; काही गोर - गरीबांच्या घरी अजून पगार झालेले नसतात म्हणून सामानाचा सुद्धा पत्ता नसतो. तर काहींच्या घरी एखाद - दुसरा पदार्थ करायला सुरुवात केली जाते. भाजके पोहे, पातळ पोहे, तळीव पोहे, मका पोहे, मोतीचूर लाडू, मसाला शेव, लसूण शेव, तिळागूळाची करंजी, ओल्या नारळाची करंजी असे प्रकार नसतात. एखादा चिवडा तोही साधे चुरमुरे किंवा फारतर कोल्हापूरी चुरमुरे चा, कानुला साधाच सुक्या खोबऱ्याचा तोही अल्प प्रमाणात, लाडू रव्याचे तेही वनस्पती तुपातील ( डालडा ) घट्ट बांधलेले. येत नाही असे नाही, परंतु; परिस्थिती नुसार काटकसरीने बनवलेला हा फराळ असतो. तोही समाधानाने, काही अन्न वाया न घालवता.
घराभोवती दिव्यांची रोषणाई नसते, परंतु; ४-५ पणत्या नक्कीच असतात , त्यापैकी एक दिवा तुळशीला आठवणीने लावला जातो. एक दिवा शेणाने घातलेल्या पांडव व गवळणींच्या मध्ये लावला जातो. (पांडव व गवळणी ही प्रथा बुडाल्यातच जमा आहे.) सारवण घातले जाते.
झोपडीच्या बाहेर कोपरयात एका बाजूला काठी खोचून छोटासा आकाशकंदील लावला जातो.
लक्ष्मीपूजन म्हणाल तर, मणी मंगळसूत्र हाच एक दागिना असतो तोच तात्पुरता पुजला जातो. आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. हीच तर खरी प्रथा आहे. पाडव्याला गोडधोड म्हणून श्रीखंड पुरी होत नाही तर, पुरणपोळी करून खरयाअर्थाने नैवैद्य दाखविला जातो.
घरातील सर्वांनाच नवीन कपडे घेतली जातात असे नाही.फक्त लहान मुलांना तेही सेल लागलेल्या एखाद्या ठिकाणी. भाऊबीज बद्दल बोलायचे झाले तर; बहिणीला ब्लाऊज पीस ओवाळणी म्हणून घातला जातो किंवा त्यातल्यात्यात साडी. बाकी हट्ट करायचा प्रश्नच येत नाही.
फटाके तर अगदी मोजकेच, ते पण घरात कोणी लहान असेल तर, टिकल्या आणि लवंगी फटाके माळ सुट्टी करून एक एक उडवायचे. इतरांसारखे नाही हजार, दहा हजार ची माळ लावायला किंवा शोभेच्या फटाक्या उडवायला.
अगदी मर्यादित असते सर्वकाही. आर्थिक आणि सामाजिक विषमतेचे बळी असलेल्या या देशात रोजंदारीवर जाणाऱ्या मजुरांची सख्या प्रचंड मोठी आहे..रोज काम केल्याशिवाय त्यांना जगणे मुश्किल आहे..पूर्वी उदार मनाची माणसे खूप होती.जीव जाणत होती. गरीब लोक वर्षाची उचल घेऊन आपल्या गरीब भावंडाना चार दोन दिवस सुखी ठेवत.. काही तर घरोघरी मागून दिवाळी साजरी करत..दिवाळी मागण्याचे प्रकार देखील या देशात आहेतच..अनेक श्रीमंताच्या घरी रोजची दिवाळी असते..पण रोज कष्ट करूनही भागत नाही..अशी कितीतरी कुटुंबे आपल्याला दिसतात...शेती नाही,नोकरी नाही,पेन्शन नाही, मजुरी करूनही मुलांचे उच्च शिक्षण करायला पैसा नाही..अशी खूप कुटुंबे इथे दिसतात...वर्षभर काम करून थोडा पैसा साठवून हे दिवाळीचे दिवस साजरे करण्यासाठी मजूर गावी येतात.. दिवाळी झाली की गावातून गुडूप होतात..ही हातावरच काम करणारी पोटे देश घडवत असतात..निर्मिती करतात..रोज डोक्यावर विटा घेऊन अनेकांची घरे ,बंगले उभे करणाऱ्या स्त्रिया पत्र्याच्या शेडमध्ये संसार थाटून दिवाळी करतात...म्हणून सांगावेसे वाटते की; आपणाकडे जर कामासाठी कोणी कामगार असतील तर; त्यांना दिवाळीच्या वेळेस पगारासाठी अडवू नका. त्यांचे पगार वेळेत करा. जमले तर थोडेफार आवश्यक साहित्य घेऊन द्या. जेणेकरून त्यांनाही दिवाळी वेळेत, मुहूर्तावर साजरी करता येईल. शिल्लक राहिलेला फराळ देण्याऐवजी अगोदरच थोडा का होईना फराळ द्या. त्यामुळे त्यांची दिवाळी अधिकच गोड होईल.
सर्वांची दिवाळी खर्या अर्थाने तेंव्हाच साजरी होईल, जेंव्हा सर्वजण प्रेम भावनेने, आपुलकीने, एकमेकांच्या गरजेनुसार विचारपूस करून आनंद द्विगुणित करतील. तरच म्हणता येईल " आली माझ्या घरी ही दिवाळी"!.
लेखन
सौ. मिनल अमोल उनउने.
सातारा - ९१३०४७०३९७
संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११