विद्यार्थ्यांनो वाहतुकीचे नियम आत्मसाद करा !
हल्लीच्या वाढत्या रस्ते अपघातांवर मात करा !!
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाल्याने गुणवत्ता वाढते- समोनि.राणी सोनवणे
श्रीरामपूर / प्रतिनिधी: चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या विविध वेगवेगळ्या स्पर्धामधील यशाबद्दल तालुक्यातील जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल माळेवाडी या शाळेत नुकताच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सहायक मोटार वाहन निरीक्षक राणी सोनवणे या प्रामुख्याने उपस्थित होत्या तर या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक भागचंद औताडे, श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार पोलीस नाईक किरण टेकाळे, गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई, माजी सरपंच सोपानराव औताडे, उपसरपंच भागुबाई मगन घोडके, आयडीबीआय बँकेचे शाखाधिकारी पवन आत्राम,असिस्टंट मॅनेजर मिथिलेश कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना सुयोग्य मार्गदर्शन करताना सहायक मोटार वाहन निरीक्षक राणी सोनवणे यांनी वाढत्या रस्ते अपघातांवरील नियंत्रण म्हणजेच वाहन चालकांबरोबरच पादचाऱ्यांनी देखील रस्त्याने चालताना घ्यावयाची काळजी तसेच विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम आणि रस्त्यावर चालताना तथा वाहन चालविताना घ्यावयाची खबरदारी याविषयी उपयुक्त माहिती विषद केली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना जर चांगल्या प्रकारचे प्रोत्साहन मिळाले तर निश्चितपणे त्यांची गुणवत्ता वाढते आणि शाळेचा शैक्षणिक आलेख उंचावतो करीता "विद्यार्थ्यांनो वाहतुकीचे नियम आत्मसाद करा !, हल्लीच्या वाढत्या रस्ते अपघातांवर मात करा !!" असेही त्या म्हणाल्या.
शाळेत घेण्यात आलेल्या अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला संस्कार स्पर्धा परीक्षा मुंबई तसेच साई कलाविष्कार संस्था पुणे यांच्या चित्ररंगभरण परीक्षेत विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, मेडल, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत मिशन आरंभ इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.