श्रीरामपूर विधानसभा
मतदार संघासाठी आग्रह
मुंबई / श्रीरामपूर प्रतिनिधी:
महायुतीमध्ये शिवसेनेकडे असलेली श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाची जागा भारतीय जनता पक्षाकडे घेऊन उमेदवारी मिळावी, यासाठी भाजपचे श्रीरामपूर उपाध्यक्ष व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी मुंबईत विविध मान्यवरांच्या भेटीगाठी सुरू ठेवल्या आहेत.
भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी तथा केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री बी. शिवप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र प्रदेश भाजप निवडणूक व्यवस्थापन समितीचे संयोजक व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, निवडणूक व्यवस्थापन समितीचे सहसंयोजक व भाजप विधानसभा निवडणूक महाविजय २०२४ चे प्रमुख आ. श्रीकांत भारतीय, भाजप प्रदेश कार्यालय मुख्य प्रभारी रवीजी अनासपुरे आदी मान्यवर नेते, पक्ष पदाधिकारी यांच्या मिलिंदकुमार साळवे यांनी भेटी घेतल्या आहेत.
बुधवारी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची साळवे यांनी भेट घेतली. याप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे उपस्थित होते.
श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ युती, महायुतीमध्ये गेल्या ४० वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. पण शिवसेनेला आतापर्यंत एकदाही विजयश्री मिळविता आलेली नाही. २०१४ मध्ये राज्यात सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुका लढविल्या, तेव्हा भाजपच्या उमेदवाराने दुसरा क्रमांक गाठताना ४५ हजार मते घेऊन काँग्रेसच्या विजयी उमेदवाराशी अटीतटीची लढत दिली होती. हा एकमेव अपवाद वगळता श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपला पोषक वातावरण व वाडी, वस्ती, गाव पातळीवर संघटना बांधणी असतानाही भाजपला आतापर्यंत उमेदवारी मिळाली नाही. उमेदवारी न मिळाल्याने पक्षाचे कमळ चिन्ह मतदारसंघात पोहचत नाही.
मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यापासून विशिष्ट एकाच जातीला सर्वच राजकीय पक्ष उमेदवारी देत आले आहेत. त्यामुळे याच वर्गाला विधानसभेत तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत आली आहे. पण हा मतदारसंघ ज्या बौद्ध समाजाच्या सर्वाधिक लोकसंख्येमुळे अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला, त्या समाजावर सातत्याने राजकीय, सामाजिक अन्याय होत आला आहे. त्यामुळे श्रीरामपूर मतदार संघातील बौद्ध समाज तसेच शिव-शाहू-फुले-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरलेली आहे. साळवे यांना संधी दिल्यास सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून भाजपपासून सतत दूर राहणाऱ्या या समाजास भाजपनेच खरा सामाजिक न्याय दिला, असा संदेश मतदार संघासह राज्यभरात पोहचू शकेल, असा एक मतप्रवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये आहे.
मिलिंदकुमार साळवे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून श्रीरामपूर मतदारसंघातील पाटपाणी, बेरोजगारी, एम.आय.डी.सी., श्रीरामपूर जिल्हा, खंडकरी, आकारपडित जमिनी, मुळा प्रवरा वीज सहकारी संस्था, नगरपालिका, विकास आराखडा, अशोक सहकारी साखर कारखाना, वाढती गुन्हेगारी, सौहार्दपूर्ण सामाजिक सलोखा यासह शेतकरी, बेरोजगारी अशा विविध प्रश्नांवर आवाज उठवून हे विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
याशिवाय कोरोनाच्या महासंकटात घरातील कर्ता पुरूष गमावल्यामुळे संकटात सापडलेल्या राज्यातील कोरोना एकल महिलांसाठी हेरंब कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या माध्यमातून मोठे संघटन उभे करीत या महिला व त्यांच्या बालकांना विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांची मदत मिळवून दिली आहे. तसेच त्यांचे समाजाच्या सर्व घटकांशी मैत्रीपूर्ण, सलोख्याचे संबंध आहेत. अभ्यासू, स्थानिक, कोरीपाटी, वाद-विवादांपासून दूर अशा साळवे यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे श्रीरामपूरची जागा महायुतीमध्ये भाजपकडे घेऊन साळवे यांना उमेदवारी दिल्यास श्रीरामपूर मतदार संघात भाजपचे कमळ फुलून नवा इतिहास लिहिला जाईल, अशी भाजप कार्यकर्ते व सामान्य मतदारांची भावना आहे.
संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
फोटो कॅप्शन / बॉक्स
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची बुधवारी भेट घेतली. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपकडे घेऊन भाजपची उमेदवारी देण्याची मागणी त्यांच्याकडे केली. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे उपस्थित होते.