आयशर ट्रक उलटला,चालक पसार
अपघातात नेवासा तालुक्यातील दुचाकीस्वार दोन्ही सख्ख्या भावांचा मृत्यू
काकांच्या दहाव्याहून घरी परतत
असताना काळाने घाला घातला
भोकर प्रतिनिधी :
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारात श्रीरामपूर - नेवासा राज्य मार्गावर भरधाव आयशर ट्रक ने दुचाकीस्वारास धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात काकांच्या दहाव्याहुन घरी परतत असलेले नेवासा तालुक्यातील निपाणी निमगांव येथील शेतकरी कुटूंबातील दोघा सख्या भावांचा गंभीर जखमी होवून त्यांना उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. या अपघाताने निपाणी निमगांव गावावर शोककळा पसरली आहे.
अपघात घडल्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या प्रश्न पत्रिका घेवून जाणारा ट्रक राज्य मार्गाच्या साईड गटारमध्ये उलटला व ट्रक चालक पसार झाला. याबाबत रात्री उशीरापर्यंत तालुका पोलीसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. जखमींना दवाखान्यात हलविण्यासाठी परिसरातील तरूणांनी मदत केली.
श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्ग क्र. ४४ वर काल शनिवार दि.२१ आक्टोंबरच्या दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास नेवासा तालुक्यातील निपाणी निमगांव येथील नवले कुटूंबातील कर्ते पुरूष असलेले सख्ख्ये दोन्ही भाऊ शरद विनायक नवले (वय-३६) व अविनाश विनायक नवले (वय-३०) हे दोघे आपल्या जवळील दुचाकी क्र.एम एच १७ ए क्यू ८६८५ हिने श्रीरामपूरकडून, राहाता तालुक्यातील काकांच्या दहाव्याहुन घरी नेवासा तालुक्यातील निपाणी निमगांव येथे आपल्या घरी जात असताना समोरून नेवासाकडून श्रीरामपूरकडे जिल्हा परीषद शाळांच्या इयत्ता तीसरी ते आठवीच्या पहील्या सत्रातील प्रश्नपत्रिका घेवू चाललेला आयशर ट्रक क्र.एम एच १२ टी व्ही ४०९२ या भरधाव वाहनाने विरूद्ध दिशेने येवून या दुचाकीस्वारास जोराची धडक दिली व राज्य मार्गाच्या लगतच्या साईड गटारात जावून उलटला. ट्रक चालकाने प्रसंगावधान बघून ट्रक मधून बाहेर पडत पळ काढला. या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
हा अपघात झाल्याचे लक्षात येताच जवळच काळे वस्तीतील तरूण अरूण काळे, दिपक काळे व रावसाहेब काळे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले त्याच वेळी इतर वाहन चालकांबरोबरच येथील सोसायटीचे अध्यक्ष गणेश छल्लारे, संचीत गिरमे, धनगर समाज समितीचे तालुकाध्यक्ष राजु तागड, सावता परिषदेचे ज्ञानेश्वर शिंदे, झुंबर शिंदे, नानासाहेब काळे, प्रतिक काळे आदिंनी गंभीर जखमी नवले बंधुना रूग्णवाहीका पाचारण करून उपचारासाठी श्रीरामपूर येथील साखर कामगार रूगणलयात रवाना केले.
यातील या नवले कुटूंबातील थोरले बंधू शरद नवले यांचा श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पीटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर धाकटा अविनाश हा ही गंभीर जखमी असल्याने त्यास पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा हॉस्पीटल येथे नेत असताना हॉस्पीटलला पोहचण्यापुर्वीच त्यांचाही मृत्यू झाला. यातील थोरले शरद नवले हे नेवासा तालुक्यातील गळनिंबचे जावई आहेत तर अविनाश नवले हे श्रीरामपूर तालुक्यातील कारेगावचे जावई आहेत. मयत नवले बंधु चे पश्चात वृद्ध आई, वडीलांसह शरद यांची पत्नी, दोन शाळकरी मुली व एक शाळकरी मुलगा तर अविनाश यांची पत्नी एक शाळकरी मुलगा व शाळकरी मुलगी असा परीवार आहे. या दुर्घटनेने निपाणी निमगांव गावावर शोककळा पसरली असून मयतांवर आज रविवार अंत्यसंस्कार होणार आहेत.
अपघाताचे वृत्त समजताच तालका पोलीस ठाण्याचे पो.नि.दशरथ चौधरी यांनी अपघातग्रस्त आयशर ट्रक व दुचाकी पोलीस ठाण्यात रवाना करत वाहतुक सुरळीत केली. यावेळी त्यांचे समवेत पोलीस हवालदार राजु त्रिभुवन,अर्जून बाबर, पोलीस पाटील बाबासाहेब साळवे, पोलीस मित्र बाबा सय्यद व गृहरक्षक दलाचे सुभान शेख यांनी तातडीने वाहने ताब्यात घेवून आयशर चालकाचा शोध सुरू केला आहे. या आयशरमध्ये इयत्ता तीसरी ते आठवी पर्यंतच्या पहील्या सत्राच्या प्रश्न पत्रिका असल्याचे समजताच अपघात स्थळी परिसरातील शिक्षकांनी मोठी गर्दी केली होती.
या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत श्रीरामपूर तालुका पोलीसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सहयोगी:
पत्रकार चंद्रकांत झुरंगे -भोकर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111