शौकतभाई शेख श्रीरामपूर:
भ्रष्टाचारामुळे देशाचा आर्थिक विकास खुंटतो असे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा अधिकारी अजय बोरसे यांनी तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात कार्यालयीन विभागाने आयोजित केलेल्या "भ्रष्टाचार मुक्त भारत विकसित भारत" या विषयावरील चर्चासत्रात बोलताना केले. ते पुढे म्हणाले की, भ्रष्टाचार म्हणजे गुन्हेगारी. तो अप्रमाणिकपणाचा प्रकार आहे त्यामुळे अनेक कामे रखडले जातात, विकासाला अडथळा निर्माण होतो, पैशाचा हव्यास चांगला नाही,माणसाने लोभी आणि स्वार्थी वर्तन करू नये असेही ते म्हणाले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे म्हणाल्या की, भ्रष्टाचारामुळे देशाचा आर्थिक विकास होत नाही, त्यामुळे देश अधोगतीच्या मार्गाला लागतो, समाजाचे अध:पतन होते, कोणीही लाज देऊ नये,लाच घेऊ नये, चोरी करू नये. पात्रता नसतानाही जवळचा नातेवाईक आहे म्हणून नोकरी देऊ नये, त्यामुळे गुणवंत मागे राहतात. स्वतःच्या स्वार्थासाठी पदाचा गैरवापर करू नये या सर्व बाबी बंद झाल्या तरच देश महासत्तेच्या परिप्रेक्षात राहिल.खुल्या सत्रात डॉ.संजय नवाळे, प्रा.निजाम शेख,डॉ.बाबासाहेब पवार, डॉ. विनायक काळे यांनी विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा झाली. महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड यांनी चर्चासत्राचे अध्यक्षस्थान भूषवले. चर्चासत्राचे आयोजन कार्यालयीन अधीक्षक संदेश शाहिर यांनी केले. प्रास्ताविक व परिचय डॉ.कोकाटे यांनी करुन दिला. प्रा.प्रकाश देशपांडे यांनी उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानले.बॅक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी कृष्णा शिंदे यांनी परिश्रम घेतले. "भ्रष्टाचार मुक्त भारत विकसित भारत" या प्रतिज्ञाने चर्चासत्राची सांगता झाली.