स्त्री म्हणजे चूल आणि मूल यापुरतेच क्षेत्र असलेल्या भारतीय समाजात ममतादीदी यांनी पुरुषी क्षेत्रात कुस्तीत नावलौकिक प्राप्त केला, ही जशी अभिनंदनीय बाब आहे तशीच ही दुर्मिळ स्त्रीजीवन कथा आहे. वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील धामणी (खडी) येथील रणजित नारायणराव पवार यांनी 'ममता पहिलवान'हे एका कुस्तीपटूचे लिहिलेले चरित्र अनेक दृष्टीने आगळेवेगळे आहे.
भारतीय क्रांतिकारांनी १८५७ चा स्वातंत्र्ययज्ञ पेटविला तो काळ मोठा धामधुमीचा होता.अशा इंग्रजी राजवटीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात स्वातंत्र्यज्योत पेटलेली होती.या काळात डोंगराळ भागातील पाटोळे ता.सिन्नर जि.नाशिक येथील खंडुजी सदगीर आणि रंभाबाई सदगीर यांच्या पोटी ०१ जून १८९४ रोजी एका सुंदर, दिव्य, लोभस कन्यारत्न जन्मास आले, हे कन्यारत्न म्हणजेच कुस्तीतील लोकप्रिय असलेल्या ममताबाई उर्फ ममत्या पहिलवान होय. त्यांचा जीवनसंघर्ष चरित्र कथेत अत्यन्त प्रभावीपणे मांडलेला आहे. ममताबाईचा जन्म कानडी समाजात झाला.हा समाज गावोगावी भटकंती करीत, गोपालन करीत, शेतीकाम करीत पोट भरणारा समाज होय.तो महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या भागात जास्त विखुरलेला आहे. ममताचे वडील खडूंजी हे मूळचे येवला तालुक्यातील नगरसूलचे होय. त्यांचे पूर्वज कर्नाटकातून आलेले होते.खडूंजी हे पहिलवान होते.अतिशय रांगडे, धिप्पाड, उंच असलेल्या या पहिलवानाचे सर्व गुण ममताबाईत होते. बालपणापासून त्या कुस्ती क्षेत्रात उतरल्या. हा परिवार पाटोळे गावी स्थिरावला. डोंगरी भाग, धनदाट वृक्षवेली,या परिवारातील हैबतराव त्यांचा मुलगा मल्हारी, मल्हारीचा मुलगा येसू आणि येसूचा मुलगा खंडू होय अशा पहिलवानी परिवारातील ममताबाई वडिलांच्या तालमीत पहिलवान झाल्या.त्यांनी सर्वत्र नावलौकिक प्राप्त केला.ती ममता पहिलवान म्हणून भारतात नावाजली गेली.घरात तिला वडिलांचा आधार आणि पाठींबा होता परंतु तिच्या भावाला असे पुरुषाबरोबर कुस्ती खेळणे आवडत नसे.बाप,लेकात मोठा संघर्ष झाला,बापाच्या हातून मुलगा मारला गेला. खडूंजी तुरुंगात गेला. २० वर्षाचा कारावास मिळाला पण चांगली वागणूक म्हणून खडूंजी १५ वर्ष शिक्षा भोगून घरी आला.या खडूंजीने ममताला मजबूत केले. ममतानेही पुरुष पहिलवानाशी कुस्ती खेळताना ती घाबरली नाही,त्यासाठी तिने स्त्रीपणाला अडसर असलेल्या अवयव यांना बालपणातच मजबूत केले. छातीवर वाढणाऱ्या अवयवास दगडांनी सतत ठेचून पोलादी छाती बनविली. खंडोबा मंदिरासमोरील जोर, बैठका करताना असलेला खड्डा २०० ग्राम घामाने भरत नाही, तोपर्यंत सराव सुरु असायचा. वयाच्या १४ व्या वर्षी येणाऱ्या मासिक पाळीला भक्ती आणि कठोर तपाने तिने कायमची पाळी बंद केली. पाटोळे, सिन्नर येथील पुरुषी तालमीत ममताने सराव केला. पुरुषाप्रमाणे अंगावरील सर्व कपडे काढून ती कुस्ती खेळत असे. नाशिक, नगर, पुणे, चाळीसगांव,पाचोरा, जळगांव या भागात पहिलवान ममताने कुस्ती गाजविली. पुरुषाप्रमाणे पेहराव करीत कुस्ती खेळे आणि पुरुषाप्रमाणे राहणीमान ठेवत समाजात निर्भयपणे वावरत असे. ममताताईंचा जीवनप्रवास एक थरारक चित्रपट आहे.हे चरित्र वाचनीय आणि अदभूतरम्य आहे. ममताताईनी जेवढया कुस्त्या केल्या, त्यात एकही कुस्ती त्या हरल्या नाहीत हे वेगळे वैशिष्ट आहे.अशा ममता पहिलवान भक्ती आणि शक्तीत पारंगत होत्या.एक सात्विक ब्रह्मचारी महिला असलेल्या ममताताई नाशिकच्या कुंभमेळ्यात जात असत,१९८४ मध्ये कुंभमेळा पर्व चालू असताना त्यांचे निधन ममदापूर ता. नांदगाव जि. नाशिक येथे झाले. ९० वर्षाचे आयुष्य लाभलेल्या ममताताई पहिलवान यांचे हे चरित्र मराठी साहित्यातील आगळेवेळे आहे त्याबद्दल लेखक रणजित पवार यांचे मनापासून अभिनंदन आहे. त्यांनी आपल्या मनोगतात या पुस्तकनिर्मितीचे संदर्भ सांगितले आहेत.पुणे येथील साहित्यिक रामचंद्र जोरवर यांच्या प्रस्तावनेतून या पुस्तकाचे मूल्यमापन वाचनीय झाले आहे. अखिल भारतीय मराठी ८९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, शिरपूर, धुळे येथील प्रा. डॉ.सौ.रजनी लुंगसे, शेवटी अनेक माहितगार यांचे अभिप्राय यामुळे हे चरित्र अधिक स्पष्टपणे मनासमोर उभे राहते. ममताताईंचा कोणताही फोटो उपलब्ध नसताना आणि माहिती उपलब्ध नसताना हे चरित्र आकाराला आणणारे लेखक रणजित पवार यांचे परिश्रम मौलिक स्वरूपाचे आहेत.शेवटी लेखकाचा परिचय त्यांच्या व्यक्तिमत्व आणि साहित्य सेवेवर प्रकाश टाकणारा आहे. हे चरित्र वाचताना मनाला एक साहित्य प्रांतातील वेगळा आनंद लाभला. समशेरपूर येथील डॉ. हरिष बेणके यांनी आत्मीयतेने हे चरित्र श्रीरामपूर येथील बी.एड, कॉलेज मधील प्रा. डॉ. अनिल करवर यांच्याकडे पाठविले हे विशेष कौतुकास्पद आहे. हे चरित्र मनावर ठसणारे आणि आजच्या स्त्री जीवनाकडे विवेकी भूमिकेतून पाहण्याची दृष्टी देणारे आहे, अतंर्मुख करणारे आहे. साधी, सोपी भाषा आणि वास्तवदर्शी प्रसंग मनात घर करणारे आहे.हे चरित्र वाचण्याची ओढ जागृत वाचकांच्या मनात नक्कीच निर्माण होणार आहे,हे चरित्र चित्रपट स्वरूपाचे आहे.
==========
देशातील पहिली महिला कुस्तीपटू
ममता पहिलवान (चरित्र )
लेखक :रणजित पवार,
प्रकाशक, लेण्याद्री प्रकाशन ओतूर ता.जुन्नर जि. पुणे
श्री गाडगे महाराज संस्था,
प्रथम आवृत्ती ०१ मे २०२२
पृष्ठे १०८, किंमत १२० रुपये
पुस्तक परीक्षण :डॉ. बाबुराव उपाध्ये, इंदिरानगर, श्रीरामपूर 413709, जि. अहमदनगर
भ्रमणभाष : 9270087640
वृत्त संकलन: शौकतभाई शेख श्रीरामपूर