राजेंद्र बनकर शिर्डी : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या अहमदनगर जिल्हाप्रमुख पदी शिर्डीचे कमलाकर कोते यांची निवड करण्यात आली आहे. कमलाकर कोते हे बालपणापासून शिवसैनिक आहेत. त्यांनी शाखाप्रमुख, शहर प्रमुख, तालुकाप्रमुख जिल्हाप्रमुख असे विविध पदांची जबाबदारी उत्कृष्ट पद्धतीने सांभाळली आहे. सध्याचे राज्यात सुरू असलेले राजकीय गणित लक्षात घेऊन त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख असल्यामुळे त्यांना जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यांच्या निवडीने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिर्डीच्या माजी नगराध्यक्षा सौ.अनिता जगताप व उपनगराध्यक्ष विजय जगताप यांनीही काही दिवसापूर्वी शिंदे गटात प्रवेश केला व आता कमलाकर कोते हे देखील शिंदे गटात गेल्याने शिर्डीत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कोते यांच्या निवडीनंतर शिर्डीत शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. निवडी बाबत बोलताना कमलाकर कोते म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार सदाशिव लोखंडे यांनी माझी जिल्हाप्रमुख पदी निवड केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मला पद मिळवण्याकरिता कुठलेही लालसा नाही. साईबाबांनी दिलेल्या शिकवण अंगीकारून नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्याकरिता बाबांची सेवा म्हणून मी ही जबाबदारी स्वीकारली आहे. शिर्डीत येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन व्हावे द्वारकामाई व गुरुस्थान येथे भाविकांना जवळून दर्शन घेता यावे तसेच साई समाधी मंदिरात लावलेली काचा काढाव्या. शेतकऱ्यांना पिक विमा तात्काळ मिळावा अशा विविध मागण्या आपण मुख्यमंत्री यांच्या समोर मांडल्या असून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकरिता यापुढेही सातत्याने प्रयत्न करीत राहणार असल्याचे कोते यांनी सांगितले.