शौकतभाई शेख श्रीरामपूर:
येथील 'वर्ल्ड सामना 'या तुफान विनोदी ग्रामीण दिवाळी अंकाचे प्रकाशन मुंबई येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी नुकतेच संपन्न झाले.
'वर्ल्ड सामना'चे मुख्य संपादक प्रकाश कुलथे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून गेल्या ३० वर्षांपासून या अंकाने कसा नावलौकिक प्राप्त केला, वाड्मयीन गुणवत्ता टिकविली, वाचकांचा प्रतिसाद आणि मिळालेले राज्य,राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार याविषयी सविस्तर माहिती दिली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुलाबाचा गुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कार्यकारी संपादक स्वामीराज कुलथे, संगमनेर सुवर्णकार संघटना अध्यक्ष सुरेश नागरे, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन, मुंबईचे अध्यक्ष विनोद जगदाळे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'वर्ल्ड सामना 'दिवाळी अंकाचे सुंदर आणि राजकीय स्वरूपाचे मुखपृष्ठ पाहून हसतच या अंकाचे कौतुक केले. श्रीरामपूरसारख्या ग्रामीण जीवनाला जवळ असलेल्या या दिवाळी अंकाने गेल्या ३० वर्षांपासून जी वाचकप्रियता मिळविली त्याबद्दल संपादक मंडळाचे अभिनंदन केले. १०० वर्षांपूर्वी का. र. मित्र दिवाळी अंकाने मराठी मनाला जी वाचनाची गोडी निर्माण केली, तीच गुणवत्ता आणि लोकप्रियता 'वर्ल्ड सामना 'ने प्राप्त केली आहे, त्याबद्दल मुख्य संपादक पत्रकार प्रकाश कुलथे, कार्यकारी संपादक स्वामीराज कुलथे, व्यवस्थपकिय सौ.स्नेहलताताई कुलथे, निवासी संपादक प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये आणि इतर सर्वांचे कौतुक करून हा दिवाळी अंक आपणास मनापासून आवडला असल्याचे सांगितले. आजच्या माहिती तंत्रज्ञान, आधुनिक प्रसारमाध्यमांच्या भाऊगर्दीत 'वर्ल्ड सामना 'टिकून आहे.आज असे दिवाळी अंक वाचकांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड करतात.दिवाळी फराळाबरोबर असे वाचन युवकांना, साहित्यिकांना नक्कीच आनंद देणारे आहे.श्रीरामपूरची वाचन संस्कृती वाढविण्यात 'वर्ल्ड सामना'ने जी वाटचाल केली, करीत आहे, त्याबद्दल त्यांनी मनापासून अभिनंदन केले. कार्यकारी संपादक स्वामीराज कुलथे यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आपल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन केल्याबद्दल आनंद व्यक्त करीत, यामुळे आम्हाला आपला आशीर्वाद लाभला आहे, ही प्रेरणा आम्हाला गतिशील करणारी आहे, असे सांगत आभार व्यक्त केले.
फोटो ओळी -
मुंबई - वर्ल्ड सामना दिवाळी विनोदी विशेषांक २०२२ चे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते मुंबईतील वर्षा या त्यांच्या निवासस्थानी संपन्न झाले.यावेळी टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष विनोद जगदाळे, मुख्य संपादक प्रकाश कुलथे, कार्यकारी संपादक स्वामीराज कुलथे व संगमनेर सराफ सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष सुरेश नागरे उपस्थित आदि होते.