बेलापुर (प्रतिनिधी) : अधिवेशन संपल्यावर लवकरच जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांच्या व रेशन कार्डधारकांच्या अडचणी समजुन घेवुन त्या सोडविण्याचा प्रयत्न करु असे अश्वासन महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा .यांनी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेला दिले. अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने ना.राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेवुन दुकानदारांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या, यावेळी दुकानदारांच्या विविध अडचणी मांडताना जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी सांगितले की, जिल्ह्यात वेळेवर धान्य वहातुक न झाल्यामुळे अनेक दुकानदारांना महीना संपल्यावर धान्य उपलब्ध होते. महीना बदलल्यामुळे ते धान्य मशिनवर दिसु शकत नाही. त्यामुळे धान्य असुनही कार्डधारकांना त्याचे वाटप करता येत नाही. पर्यायाने कार्डधारकांचे धान्य बुडते. त्यामुळे धान्य वहातुक सुरळीत करण्यात यावे, गेल्या काही महीन्यापासून धान्य वाटप करण्याच्या पाँज मशिनला अनेक अडथळे येत असल्यामुळे दुकानदारांना धान्य वाटप करणे मुश्कील झाले आहे, धान्य असुनही वाटप करता न आल्यामुळे दुकानदारांना कार्डधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, माल आल्यानंतर तो वेळेवर मशिनवर टाकला जात नाही, दुकानदारांनी मोफत धान्य वाटप केले परंतु त्याचे मार्जिन अद्यापही दुकानदारांना मिळालेले नाही, राज्य शासनाने माहे मे २०२१ मध्ये मोफत धान्य देण्याचे जाहीर केले, त्याचे पैसे दुकानदारांनी भरलेले होते ते कमिशनसह परत मिळावे,दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी,अशा मागण्या दुकानदारांच्या शिष्टमंडळाने नामदार राधाकृष्ण विखे पा. यांच्याकडे केल्या. या शिष्टमंडळात स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, सचिव रज्जाक पठाण, प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरगे ,श्रीरामपुर धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, राहाता तालुकाध्यक्ष ज्ञानदेव वहाडणे, गणेश येलम ,श्रीकांत म्हस्के, कृष्णा गागरे, बाळासाहेब धनवटे , अजीज शेख, किशोर चेचरे आदींचा समावेश होता.