श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : प्राचार्य डॉ. के.एच.शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या सावळज जि.सांगली शाखेतून पुन्हा श्रीरामपूरच्या रावबहादूर नारायणराव बोरावके (आर.बी.एन.बी.) कॉलेज ला बदली झाली, त्यांच्या आगमनाप्रीत्यर्थ अनेक शाखा,व्यक्ती आणि मित्र परिवारातर्फे त्यांचा स्वागतपर सन्मान करण्यात आला.प्राचार्य डॉ.के.एच.शिंदे यांनी २०१५ ते २०२० या काळात बोरावके कॉलेज ला प्रभावी शैक्षणिक कार्य केले.त्यांच्या अनुभवी गुणवत्तेमुळे कॉलेज ला नॅक समितीने ए प्लस ३.४४ सी.जी.पी.ए. इतकी ग्रेड प्रदान केली आहे, संस्थेत आणि राज्यात प्रथम तर राष्ट्रीय स्तरावर दुसरा क्रमांक असलेल्या बोरावके कॉलेज ने शैक्षणिकदृष्टया गुणवत्ता ,समृद्ध परिसर आणि सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त केली. ग्रामीण भागातील एक सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पुरस्कार त्यांच्या काळात कॉलेज ला लाभला.रयत शिक्षण संस्थेचा प्राचार्य एन.आर.माने गुणवंत आणि निष्ठावंत पुरस्काराने प्राचार्य डॉ.शिंदे सन्मानित झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १५ विद्यार्थ्यांनी पीएच.डी.प्राप्त केली. अनेक विद्यार्थी एम.फिल. झाले. संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या आणि श्रीरामपूर रयत शैक्षणिक संकुलच्या अध्यक्षा मीनाताई जगधने यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ.के.एच.शिंदे यांनी बोरावके कॉलेज ला अनेक शैक्षणिक, सामाजिक सेवेभावी उपक्रम राबविले.शारदीय उद्यान, देखण्या इमारती, सुंदर, मजबूत कॉलेज गेट, स्वच्छता, विविध विभागीय सुधारणा त्यांनी केल्या.नंतर त्यांनी पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय आणि सावळज येथील आर. आर.पाटील महाविद्यालय शाखेत प्रभावी नेतृत्व केले.अशा गुणवत्ताशील, सर्वसमावेशक धोरण असलेले, संस्थेच्या सहसचिवपदाचे अनुभव असलेले व्यक्तिमत्व पुन्हा बोरावके महाविद्यालयात बदलून आले.'समर्पित जीवनाचे आदर्श'हे त्यांचे पुस्तक लोकप्रिय आहे, त्यामध्ये अनेक मान्यवरांच्या आदर्श कार्याचा शोध आणि बोध त्यांनी शब्दबद्ध केला आहे.१० संशोधन पुस्तके, त्यांनी राज्य, राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पातळीवरील २८ संशोधन प्रकल्प सादर करून त्यांनी एक संशोधक प्राचार्य म्हणून ख्याती मिळविली. त्यामुळेच त्यांचे मार्गदर्शनपर अनेक व्याख्याने विविध महाविद्यालयाला दिशादर्शक ठरली.त्यांनी लिहिलेली पुस्तके आणि जोडलेली माणसं ही त्यांच्या माणुसकीच्या जीवनाची शिदोरी आहे. त्यांचा जनसंपर्क आणि ज्ञानमंदिरातील शिस्तबद्व जीवनप्रवास म्हणजे एक आनंदपर्वणी आहे, ह्याच भावना व्यक्त करीत प्राचार्य डॉ.के. एच.शिंदे यांचे अनेकांनी स्वागतपर सत्कार केले.