भोकर (वार्ताहर) - श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथे शेताातील किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचे रूपांतर हाणामार्यात होवून कचरे आणी काळे या प्रतिष्ठीत कुटूंबात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले असून या वादात दोन्ही कुटूंबातील फिर्यादी महिलांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. जखमींच्या जबाबावरून तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दखल झाले आहेत.
खोकर शिवारातील रहिवाशी असलेले किशोर काळे व दत्तात्रय कचरे हे दोनही कुटूंब प्रतिष्ठीत कुटूंब म्हणून परीसरात परिचीत आहे. गेल्या काही वर्षांपासून या दोन कुटूंबात वाद झालेले आहेत, तर ही बाब न्यायप्रविष्ट असल्याचे चर्चा गावात सुरू आहे. श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं. 1283 नुसार फिर्यादी सौ.अनिता दत्तात्रय कचरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 1) अशोक ज्ञानदेव काळे, 2 )संजय ज्ञानदेव काळे, 3) राजेश दादासाहेब काळे, 4) किशोर पांडूरंग काळे, 5) प्रगती किशोर काळे, 6) नानासाहेब मच्छींद्र काळे 7) प्रदिप/ बाल्या तात्यासाहेब काळे यांचे विरूद्ध भादंवि कलम 324, 323, 504, 506, 427, 143, 147,148 व 149 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता कचरे यांनी दि.17 ऑगष्टच्या दुपारी दोन ते आडीच वाजेच्या सुमारास फिर्यादी शेताच्या बांधावर खोकर येथे प्रगती काळे हिने तीच्या हातातील खुरप्याने उजवे हातावर मारून जखमी केले. आरोपी क्रं.1 ते 4 व 6 यांनी मला, माझे पती व मुलास काठीने व लाथाबुक्कयाने मारहाण करून माझे घराच्या दरवाजाचे नुकसान केले. सदरचे घटनेदरम्यान गळ्यातील पोत तुटून गहाळ झाल्याचा गुन्हा सौ. अनिता कचरे यांचे दवाखान्यातील जबाबवरून दाखल करण्यात आला असून पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि.मच्छींद्र खाडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. अर्जून बाबर हे करत आहेत.
तर गुन्हा र.नं.1287 नुसार फिर्यादी प्रगती किशोर काळे यांनी दि.17 ऑगष्टच्या दुपारी साडेबाराच्या दरम्यान 1) विनोद दत्तात्रय कचरे, 2) अनिता दत्तात्रय कचरे व 3) दत्तात्रय तुकाराम कचरे यांचे विरूद्ध भादंवि कलम 324, 323, 504, 506 व 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. यात प्रगती काळे यांनी फिर्यादी हि तीचे शेतात मका लावीत असताना वरील आरोपी यांनी फिर्यादीस काठीने, लाथाबुक्क्याने मारहाण करून घाणघाण शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद प्रगती काळे यांचे दवाखान्यातील जबाबवरून दाखल करण्यात आली असून पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि.मच्छींद्र खाडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. अर्जून बाबर हे करत आहे.
दरम्यान या हाणामार्यांच्या गुन्ह्यात काळे व कचरे कुटूंबियांनी एकमेकाविरूद्ध परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले असले तरी दोन्ही फिर्यादीत घटना घडल्याचे सांगीतले असले तरी वादाचे किंवा भांडणाचे कारण मात्र कुणीच फिर्यादीत उल्लेख न केल्याने ही भांडणे जमीनीच्या जुन्या वादाच्या कारणावरून झाली असल्याची चर्चा सुरू आहे.