श्रीरामपूर (शौकतभाई शेख) :
गावात ग्राम सभेचे सदस्य असलेले ग्रामस्थ हेच सरकार असून ग्रामस्थांनी त्यावर लक्ष केंद्रित करून सक्रीय सहभागीता करुन गावाचा व आपला विकास करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भ्रष्टाचार विरोधी जनांदोलनाचे राज्य सरचिटणीस अशोक सब्बन यांनी कोऱ्हाळे येथे कार्यक्रमात बोलताना केले.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे निमित्ताने निळवंडे कालवा कृती समितीच्या कोऱ्हाळे व भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन च्या राहाता शाखेच्यावतीने ज्येष्ठ कार्यकर्ते सोमनाथ दरंदले यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी भारतीय संविधानाचे पूजन भ्रष्टाचार विरोधी जनांदोलनाचे सरचिटणीस अशोक सब्बन यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रा.एल.एम.डांगे,कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,समितीचे ज्येष्ठ नेते सोमनाथ दरंदले,डॉ.शिंदे दीपक,ज्ञानेश्वर चौधरी,बुद्धिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सतीश निकम,जनार्दन शेजुळ,ग्रामसेवक संजय कहांडळ,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना श्री. सब्बन म्हणाले ,"ग्रामसभांना व्यापक अधिकार दिले आहे.त्यातून ग्रामस्थांचा सर्वागिण विकास करण्याचा अधिकार दिला आहे. ग्रामसभांना विचारल्याशिवाय एक रुपया देखील खर्च करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीस नाही, गावांचा विकास आराखडा करण्याचा अधिकार व त्यास प्रशासकीय मंजूरी देण्याचा अधिकार ग्रामसभेस आहे, प्रश्न विचारण्याचा व चर्चा करून निर्णय करण्याचा अधिकार दिला आहे. लेखमेंढणा या ग्रामदानी गावाची जमीन संपूर्ण ग्रामसभेच्या नावावर आहे.वनउपज यातून लिलाव करून संपूर्ण उत्पन्न गावाला दिले जाते.मा.अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे ग्रामसभा सक्षम केले आहे.गावात ५५० विंधन विहीरी घेतल्या होत्या.पाणी उपलब्ध राहण्यासाठी ग्रामसभा घेऊन मार्च,एप्रिल, मे मध्ये बंद पडलेले बोअर बंद करण्याचा निर्णय घेतला व ३५० बोअर बुजवले आहे.फक्त पिण्यासाठी परवानगी दिली तसेच पाणी मोजून पाण्यचे अंदाज पत्रक करुनच पाणी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विहिरीचे भूजल पातळी वाढली आहे.पाणी वाढल्याने सर्वांना समान न्याय मिळाला आहे.७३ व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी करणे एवढे सोपे नव्हते, तीन वेळा १३ दिवसांचे अण्णांनी उपोषण केले त्यावेळी ती ७३ व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी केली गेली,आता ग्रामसभा घेण्याचे काम आपले आहे.विकास कामांचा आढावा ग्रामस्थांनी व ग्रामसभांनी घेतला पाहिजे, १४ विभागाचे २९ विषय ८१ कामे ग्रामपंचायतींवर सोपवले आहे, त्यात आरोग्य, शिक्षण, रोजगार, ग्रामविकास, पशुसंवर्धन, सहकार आदींचा समावेश आहे. गावात ग्रामस्थ हेच सरकार आहे."हमारे गाव मे हम ही सरकार" हे ध्यानी घेतले पाहिजे.प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक जण विकासाचा दावा करतात पण विकास म्हणजे काय ? प्रत्येक जिवंतपणाचा विकास करावा लागेल जल, जमीन,जंगल, जनावरे,जनता त्याचा विकास करायला हवा असे सांगून त्यावेळी पंजाब मधील वास्तव सांगताना ते म्हणाले की," पंजाबमध्ये पाणी खूप आहे पण विकासाला गालबोट आहे.ते म्हणजे तरुण पिढी व्यसनाधीन झाली आहे.भटिंडा ते अमृतसर येथे धावणाऱ्या रेल्वेला कॅन्सर ट्रेन असे नाव पडले आहे,या ट्रेनमध्ये येणारा- जाणारा प्रत्येक माणूस कँसरचा रुग्ण आहे,म्हणून या ट्रेन ला 'कॅन्सर रेल्वे' असे नाव पडले आहे,मग तुम्हाला नेमके विकास कसा हवा ? असा त्यांनी रास्त प्रश्न विचारला आहे, आजही गावोगाव आरोग्य, शिक्षण, उपजीवीका बाबत जागृती नाही बलोद्यान ,व्यायाम शाळा, क्रिडांगण नाही,पिण्यासाठी शुध्द पाणी व शेतीसाठी पाणी नाही, हे कशाचे वास्तव आहे ?, रस्ते, गटार, हायमॅक्स यावर आम्ही थांबलो आहे.शास्वत विकासाची निती स्विकारुन विकासाची भूमिका घेतली पाहिजे. आईन्सटाईन याने सांगितले,"ज्या दिवशी मधमाश्या नष्ट होतील त्या दिवशी मानवजात नष्ट होईल" हे का सांगितले याचा विचार आपण करणार आहोत की नाही ?, कोरोना कालखंडात अनेकांची जवळची माणसे दगावली.कारण आमची रोग प्रतिकारक शक्ती नष्ट झाली हे त्याला कारण आहे, कुपोषण झाले आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे कार्य आपल्यालाच करावे लागेल.
गावात पिण्यास येणारे पाणी आम्ही केवळ दहा टक्के योग्य वापरतो,बाकी वाया घालवतो, यातील नव्वद टक्के पाणी जमिनीत शोषखड्या मार्फत मुरवले व वाचवले तर गावाचा पाण्याचा वाॅटरटेबल वाढायला मदत होईल. सांडपाण्यावर प्रक्रीया करुन केलेली वृक्ष लागवड जगवू शकतात.आमचा दृष्टिकोन बदलला तरच विकास होईल,गावातील प्रत्येकाची आरोग्य तपासणी करा व प्रत्येकाचा हिमोग्लोबिन वाढवा, रोग नाहीसे होतील, आरोग्यावर होणारा खर्च वाचेल असेही ते म्हणाले.आगामी काळात ज्येष्ठ समाजसेवक मा.अण्णासाहेब हजारे यांच्या नेतृत्वाखाली लोकायुक्ताचा कायदा मंजूर करणार आहे,ग्रामसभा कायदा, सेवा हमी कायदा, माहिती अधिकार कायदा याच्या निकोप वापरातून लोकशाही मजबूत करवी असे आवाहनही केले, ग्रामसभेत मागील इतिवृत्त, ठराव वाचले पाहिजे,जमा खर्च तपासून पडताळणी करुनच त्याला मंजुरी दिली पाहिजे, त्याबाबत सजग राहिले पाहिजे तरच भ्रष्टाचार थांबू शकेल.कायदे साक्षरता ज्ञान आम्हाला नाही म्हणून आमचे आर्थिक शोषण होते आहे,आम्ही देशाचा कारभार चालवू शकतो तर गावाचा कारभार योग्य का करू शकत नाही ?, मनरेगासाठी मोठे योगदान महाराष्ट्र राज्याचे आहे, आम्ही ४२ टक्के रक्कम केंद्राला पाठवतो, परंतु त्यातून आम्ही केवळ ६ टक्के रक्कम वापरतो,बाकी निधी इतर राज्य वापरून याचा मोठा फायदा उचलतात,आपणही त्यातून अनेकांना रोजगार व इतर विकास कामे करू शकतो,याबाबत जनजागृती करणे गरजेचे असल्याचेही शेवटी ते म्हणाले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.एल.एम.डांगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सोमनाथ दरंदले यांनी मानले.