शौकतभाई शेख श्रीरामपूर:
जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजी विषयाचे दर्जेदार शिक्षण मिळावे, श्रवण,भाषण, वाचन या कौशल्यांचा विचार करून, संजीवन दिवे.शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती राहाता. जिल्हा -अहमदनगर. यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतून "संजीवन इंग्रजी वाचन प्रकल्प" सुरु केला. सुरुवातीला शाळा भेटीतून शिक्षकांचे योग्य समुपदेशन करून शिक्षकांचा आत्मविश्वास वाढविला. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला, प्रत्यक्ष अध्यापनाचे प्रात्यक्षिक दाखवले, विद्यार्थी प्रतीसदाचा सकारात्मक स्वीकार केला. ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही. या भावनेतून प्रत्येक शिक्षक बंधू भगिनी या उपक्रमात सक्रिय योगदान देत आहे. विद्यार्थी देखील आत्मविश्वासाने इंग्रजी वाचन, लेखन संभाषण करत आहे. विद्यार्थ्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी हा प्रकल्प खूपच प्रेरणादायी ठरणार आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी उत्तम इंग्रजी वाचू लागले. हे गावातील सुज्ञ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपक्रम सुचला. ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी चांगलं वाचता येते, त्यांचा मोबाईल मध्ये छोटासा व्हिडिओ तयार करायचा. तो व्हिडिओ शिक्षकांनी स्वतःच्या स्टेटसला ठेवायचा. शिक्षकांकडे बीएलओ चे कामकाज असल्यामुळे गावातील सर्व नागरिकांचे नंबर त्यांच्याकडे सेव आहेत. व शिक्षकांचे नंबर गावातील नागरिकांकडे सेव आहेत. शिक्षकांनी ठेवलेल्या टेटस गावातील अनेक नागरिक पाहू लागले. जिल्हा परिषद शाळांमध्ये उत्तम इंग्रजीचे शिक्षण दिले जाते, अशा चर्चा रंगू लागल्या .संजीवन इंग्रजी वाचन प्रकल्पाचे फायदे झाले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेबद्दल आत्मविश्वास निर्माण होऊन, इंग्रजी भाषेची भीती कमी झाली. इंग्रजी वाचनाला प्रेरणा मिळाली. इंग्रजी वाचन करण्यास विद्यार्थी स्वतःहून पुढे यायला लागले. जिल्हा परिषद इंग्रजी विषयाचे उत्कृष्ट कामकाज सुरू आहे,हे संपूर्ण गावाला समजू लागले. गावात, शाळेत, घराघरात इंग्रजी वाचण्याची चर्चा होऊ लागली. शिक्षकांनी स्टेटस ठेवल्यामुळे अनेक स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होऊ लागले. इंग्रजी वाचन शिकविण्या साठी विशिष्ट दिशा मिळाली. गावात शिक्षकांचा सन्मान व प्रतिष्ठा वाढली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाचा पाया पक्का झाला. इंग्रजी वाचन करता येते म्हणून सेमी इंग्रजीचा अभ्यास करणे सोपे झाले. विद्यार्थी, शिक्षक,पालक, अधिकारी, पदाधिकारी समन्वयाने कामकाज करू लागले. शिक्षक विद्यार्थ्यांचे स्टेटस त्यांच्या मोबाईलला ठेवणार या कल्पनेने मुले आनंदी आहेत. झपाटल्यागत इंग्रजी वाचनाचा सराव करतायेत. पालक सुद्धा मुलांना घरी इंग्रजी वाचन शिकवतात. मुलांच्या अभ्यासात पालकांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळायला लागले,पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणाबाबत जागृत झालेले आहेत. शिक्षकांनी केलेले शैक्षणिक कामकाज समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रकल्प अतिशय उपयुक्त आहे. अधिकारी स्वतः हातात पुस्तक घेऊन विद्यार्थ्यांना शिकवतात, हे शिक्षकांना व विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी आहे. अधिकाऱ्याने असे मार्गदर्शन करणे म्हणजे शिक्षकांना शैक्षणिक कामकाज करण्यात आणखीन ऊर्जा मिळते. जे विद्यार्थी इंग्रजी वाचण्यात मागे आहे त्यांचे पालक शिक्षकांच्या भेटी घ्यायला लागले आहेत. आमच्याही पाल्याला इंग्रजी वाचन शिकवा, त्याचेही मोबाईलवर स्टेटस ठेवा असा आग्रह धरू लागले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये उत्कृष्ट इंग्रजी विषय शिकवला जातो, हा संदेश सर्वत्र जात आहे. संपूर्ण गावचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक बंधू भगिनीं बाबत दृष्टिकोन अतिशय सकारात्मक तयार झालेला आहे. आपण अभ्यासात मागे आहोत, असा न्यूनगंड काही विद्यार्थ्यांमध्ये असतो. त्यामुळे ते शाळेत येण्यास टाळाटाळ करतात, आपले इंग्रजी टेटस, आपले सर ठेवतात, या प्रकल्पामुळे विद्यार्थी शाळेत आनंदाने येऊ लागले. एका शिक्षकाचा हा प्रकल्प पाहून अनेक शिक्षक प्रेरित झाले. जिल्हा परिषद शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळण्यास प्रोत्साहन मिळाले. निश्चितच या प्रकल्पामुळे संपूर्ण शिक्षण विभागाची प्रतिष्ठा वाढल्याचे दिसून येते.