समीर बेग राहाता
सौ.अमृता फडणवीस यांनी आपल्या धावत्या दौ-यात तालुक्यातील लोणी येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थींनींशी संवाद साधत विद्यार्थींनींनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांना तेवढ्याच हजर जबाबीपणाने सकारात्मक उत्तर देवून त्यांनी विद्यार्थींनींमध्ये नवी उर्जा निर्माण केली. माझे आई-वडीलांचा व्यवसाय हा डॉक्टरकीचा आहे. परंतू त्यांचे आर्थिक व्यवहार मी महाविद्यायात होते तेव्हापासून पाहत होते. त्याचवेळी मी बॅंकीग क्षेत्रात येण्याचा निश्चित केला होता. आपले ध्येय ठरले असेल तर यश मिळविणे कठीण नसते असे त्यांनी सांगितले. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष आहेच परंतू दैनंदिन जीवनात चांगले व्यवस्थापन केल्यास काम करण्याची उर्जा ही मिळत राहते. कोणाला काहीही म्हणू द्या आपण आपल्या निश्चयावर ठाम राहायचे, ‘जिंकुन घे चार दिशा, गर्जना कर यशाची’ या आपल्या कवितेच्या ओळीतून सौ.अमृता फडणवीस यांनी प्रवरा शैक्षणिक संकुलातील विद्यार्थींनींमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
मी उपमुख्यमंत्र्यांची पत्नी जरी असले तरी कुटूंबामध्ये वेळेचे व्यवस्थापन आम्ही चांगल्या पध्दतीने केले आहे. रात्री उशिरापर्यंत आमच्या भेटी सुरु असतात. लोकांसाठी काम करणे हीच देवेंद्रजींची सुध्दा सवय आहे, समाजासाठी योगदान देण्याचा त्यांचा स्वभाव हा पहिल्यापासुनच आहे. लोकांसाठी करीत असलेले काम हीच त्यांची उर्जा असल्याने पुढच्या कामासाठी त्यांना उमेद मिळते असेही सौ.फडणवीस यांनी एका प्रश्नात स्पष्ट केले. आपल्या आयुष्यातील संघर्षाचा काळ कोणता या प्रश्नाला भावनीकतेने उत्तर देताना सौ.फडणवीस म्हणाल्या की, दिवीशाचा जन्म झाल्यानंतर तीन महिण्यांची सुट्टी संपवून बॅकेंत जेव्हा कामावर पुन्हा हजर झाले तेव्हा बारा ते तेरा तास तिला सोडून राहावे लागले तो काळ माझा संघर्षाचा होता. परंतू यावरही यशस्वीपणे मात केली. प्रत्येकाच्या आयुष्यात असे संघर्ष येतच असतात असे स्पष्ट करुन अमृताजींनी विद्यार्थींनीमध्ये उर्जा निर्माण होण्यासाठी स्वत:च्या कवितेच्या ओळी गाऊन दाखविल्या. मला लहाणपणापासूनच गाण्याची आवड होती. माझे वडील आणि आजीकडून गाण्याचा हा वारसा मला मिळाला, गाण्याबरोबरच कथ्थक आणि भरत नाट्यम या नृत्य प्रकारांची सुध्दा मला आवड असून, अभ्यासा व्यतिरिक्त आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपण लक्ष केंद्रीत केले पाहीजे. पालकांनी सुध्दा यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तुमचे आयुष्याचे ध्येय काय आहे या विचारलेल्या प्रश्नाला समर्पक उत्तर देताना सौ.फडणवीस म्हणाल्या की, लोकसेवा करत राहाणे आणि आनंदी समाज पाहत राहणे हे माझे अंतीम ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी अमृता फडणवीस यांनी सर्व विद्यार्थींनींबरोबर सेल्फी घेवून विद्यार्थींनींना आनंदीत केले.