रमेश जेठे (सर) अहमदनगर:
मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी रायगडचे पत्रकार मिलिंद अष्टीवकर यांची तर सरचिटणीसपदी अहमदनगर ज्येष्ठ पत्रकार मन्सूरभाई शेख यांची निवड झाली आहे ३१ ऑगस्ट २०२४ पर्यत ते या पदावर असतील, रायगडच्या पत्रकाराला परिषदेचे कार्याध्यक्ष होण्याचा बहुमान दुसऱ्यांदा मिळत आहे,यापुर्वी सुप्रिया पाटील परिषदेच्या अध्यक्ष होत्या.
मिलिंद अष्टीवकर हे रोहा येथून दै. लोकमतचे काम करतात, गेली २० वर्षे ते परिषदेशी जोडलेले आहेत, कोकण विभागीय सचिव, परिषदेचे कोषाध्यक्ष आदि पदे त्यांनी या आधी यशस्वीपणे सांभाळलेली आहे, परिषदेच्यावतीने ते अधिस्वीकृती समितीवर देखील होते,पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार पेन्शन योजना आणि पत्रकारांच्या हक्कासाठीच्या प्रत्येक लढ्यात त्यांनी नेहमीच बिणीच्या शिलेदाराची भूमिका पार पाडली आहे, विविध सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग असतो, मुंबई - गोवा महामार्गासाठी च्या कोंकणातील पत्रकारांच्या लढ्यात त्यांची भूमिका नेहमीच निर्णायक होती व आहे, एक स्पष्ट वक्ता, निर्भिड पत्रकार,चांगला संघटक अशी त्यांची ओळख आहे.
मन्सूरभाई शेख हे अहमदनगर येथील ज्येष्ठ पत्रकार आहेत, गेली पंचवीस वर्षे पत्रकारितेत असलेल्या मन्सूरभाई किमान पंधरा वर्षे परिषदेशी जोडलेले आहेत, परिषदेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग असतो, अहमदनगर प्रेस क्लबचे त्यांनी मागे अध्यक्षपदही भूषविले आहे, एक मनमिळाऊ, मितभाषी पत्रकार आणि चांगला संघटक असलेल्या मन्सूरभाई यांचे स्वतः चे युट्यूब चॅनल आहे, तत्पूर्वी त्यांनी विविध दैनिकाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे.
दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक,अध्यक्ष शरद पाबळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत..
मिलिंद अष्टीवकर आणि मन्सूरभाई यांच्या कार्यकाळात परिषद अधिक पत्रकाराभिमूख होईल आणि पत्रकारांचे सर्व प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास एस.एम देशमुख यांनी व्यक्त केला आहे.