शौकतभाई शेख श्रीरामपूर
वाहने चालवितांना वाहन चालकांनी रस्ते तसेच वाहन सुरक्षेबाबतचे नियम काटेकोरपणे पाळावेत जेणेकरुन अपघात टळतील आणि अनेकांचे प्राणही वाचतील. ऊस वाहतूक करणार्या वाहन चालकांनी याबाबत विशेष खबरदारी घ्यावी. वाहन चालकांनी वाहन सुरक्षेबाबतचे नियम जाणून घेतले पाहिजे आणि त्याचे योग्य ते पालन केले पाहिजे, असे आवाहन श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक योगेश मोरे यांनी केले.
तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखाना येथे वाहन सुरक्षा व अपघात निवारण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी वाहन चालकांना मार्गदर्शन करतांना श्री.मोरे बोलत होते. यावेळी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रज्ञा अभंग, हेमंत निकुंभ, गणेश राठोड, रोशनी डांगे, मयुर मोकळ, रोहित पवार, विकास लोहोकरे, सुरेश शिंदे, धिरज भांगरे, पांडूरंग सांगळे, कुणाल वाघ, कारखान्याचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, माजी चेअरमन सोपानराव राऊत, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, संचालक रामभाऊ कसार, आशिष दोंड आदी उपस्थित होते.
सहाय्यक वाहन निरीक्षक रोशनी डांगे म्हणाल्या की, जगामध्ये वाहन अपघातात दरवर्षी साडेतेरा लाख व्यक्ती मृत्यूमुखी पडतात. त्यांचे स्मरणार्थ दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या तिसर्या रविवारी स्मरणदिन पाळला जातो. यानिमित्ताने वाहन चालकांनी वाहन सुरक्षेबाबतचे नियम जाणून घेऊन त्याचे पालन करणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर वाहनाची नियमित दुरुस्ती व देखभाल करणे याकडेही लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
यावेळी ऊस वाहतूक करणार्या ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाड्यांना रेडियम रिफ्लेक्टर स्टिकर लावण्यात आले. तसेच उपस्थित वाहन चालकांना वाहन सुरक्षेबाबतची शपथ देण्यात आली. कारखान्याचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक केनयार्ड सुपरवायझर भिकचंद मुठे यांनी केले. यावेळी कार्यक्रमास शेतकी अधिकारी नारायण चौधरी, कार्यालय अधिक्षक विक्रांत भागवत, गॅरेज इनचार्ज रमेश आढाव, बाबासाहेब तांबे, राजेंद्र उघडे, योगेश लेलकर, मोहन गावडे, विनायक ढोले, महेंद्र पवार, अमोल कोतकर आदींसह वाहन चालक व मालक उपस्थित होते.