श्रीरामपूर (वार्ताहर) :
घरातल्या वाचन संस्कृतीमुळे मुले पुस्तकाकडे आकर्षित होतात घर हे मुलांच्या जीवनातील प्रथम संस्कारकेंद्र होय,घरात असतील पुस्तके तरच घडतील मस्तके हे लक्षात घेऊन टीव्ही, मोबाईल,संगणक यांच्यापेक्षा प्रथम पुस्तकांना घरात स्थान आणि मान असला पाहिजे, असे मत नाशिक येथील स्वाध्याय परिवार केंद्राच्या ग्रन्थप्रेमी सदस्या सौ. सुनीता संतोष सोनवणे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील इंदिरा नगरमधील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे झालेल्या पुस्तकचर्चा आणि सत्कारप्रसंगी सौ.सुनीता सोनवणे यांनी सन्मानप्रसंगी आपले व्यक्त केले.वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी नाशिक येथील स्वाध्याय केंद्रातील सेवाभावी कार्य आणि पुस्तकवाचन चळ्वळीबद्दल सौ.सुनीता सोनवणे आणि श्री संतोष सोनवणे यांचा सत्कार केला. स्वाध्याय सोनवणे परिवाराच्या वाचन चळवळ वाढविण्यासाठी, कार्यासाठी डॉ.बाबुराव उपाध्ये यांच्यातर्फे अनेक पुस्तके भेट म्हणून देण्यात आली.सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी सौ.सोनवणे यांचा सत्कार केला.भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झालेले मेजर नंदकुमार संतराम सैंदोरे यांचाही यावेळी सोनवणे, उपाध्ये परिवाराने सन्मान केला.
सौ.सुनीता सोनवणे यांनी डॉ.बाबुराव उपाध्ये यांच्या वाचन संस्कृती वाढविण्यासाठी करीत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.डॉ.उपाध्ये यांनी सेवानिवृत्तीनंतर या कार्याला अधिक गती दिली हे कौतुकास्पद आहे.आम्ही वाचतो म्हणून आमची मुले वाचतात हे संस्कार घराघरात झाले पाहिजे.उपाध्ये परिवाराने आपल्या अवतीभवती सेवाभावी वाचन संस्कृती वाढविली हा आदर्श जपला पाहिजे असे मत व्यक्त सौ.सोनवणे यांनी केले.नंदकुमार सैंदोरे यांनी डॉ.उपाध्ये यांनी लिहिलेल्या ५० पुस्तकांची माहिती देऊन विविध उपक्रमाची चर्चा केली.संतोष सोनवणे यांनी शेकडो पुरस्कार आणि हजारो पुस्तकांची ही वाचन संस्कृती पाहून आनंद व्यक्त केला. सौ.मंदाकिनी उपाध्ये यांनी आभार मानले.