आरटीओ कार्यालयातील गैरकारभाराबाबत, जिल्हा टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल मुथा यांचा आंदोलनाचा इशारा
श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील आर.टी.ओ. कार्यालयातील दलाल आणि अधिकारी यांचेकडून संगनमताने व्यवसाय कराच्या सरकारी रकमेची राजरोस लूट केली जात असल्याचा आरोप जिल्हा टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल मुथा यांनी केला आहे.
यासंदर्भात माहिती देताना श्री.मुथा यांनी सांगीतले की, वाहन परवान्यासाठी व्यवसाय कर भरुन त्याची पावती सादर केल्यावर आर.टी.ओ. कार्यालयाकडून परवानगी दिली जाते. माञ अनेक प्रकरणी पावती सादर केल्यावर या पावतीवर क्रमांक नसल्याने ती ग्राह्य नसल्याचे सांगून परवाना नाकारला जातो. वाहनधारकाने संबंधित दलालाकडे रोख रक्कमा भरुन पावती घेतल्यानंतर हा प्रकार घडतो. तसेच वाहनधारकाकडे व्यवसाय कराची मागील बाकी असल्याचेही सांगण्यात येते.
संबंधित वाहन धारकाकडे व्यवसाय कराची मागील बाकी असेल तर मग त्या वाहन धारकाला परवाना कसा दिला जातो,तसेच याबाबातची माहिती विचारल्यावर आमचेकडे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे उत्तर दिले जाते.रेकॉर्ड उपलब्ध नाही तर मग मागील व्यवसाय कराची मागणी कोणत्या आधाराने केली जाते. तसेच मागील एक रुपयाची देखील बाकी असेल तर परवाना दिला जात नाही. असे असताना मागील परवाने कसे दिले गेले, असा सवाल श्री.मुथा यांनी उपस्थित केला.
याचप्रमाणे व्यवसाय कर भरल्याची पावती वाहनधारक स्वतः घेवून गेला तर पावतीवर नंबर नाही, असे सांगून अधिकारी परवाना नाकारतात. माञ तिच पावती एजंट घेवून गेला तर माञ परवाना दिला जातो. पावती जर बनावट असेल तर मग आर.टी.ओ च्या अधिका-यांनी रितसर गुन्हा दाखल करावा. व्यवसाय कर भरुनही पावत्या बनावट असल्याचे सांगीतले जावून परवाना नाकारला जातो. याचाच अर्थ दलालांकडून नंबर नसलेल्या बनावट पावत्या दिल्या जातात हे स्पष्ट आहे. तसेच रेकॉर्ड उपलब्ध नसताना मागील दोन तीन वर्षाची व्यवसाय कराची बाकी दाखविली जाते हे गौडबंगालच आहे. व्यवसाय कर भरुन त्याची रितसर पावती घेतल्यावरही सदर पावतीवर नंबर नाही, असे सांगू परवाना नाकारला जातो. तर भरलेलेली रक्कम जाते कुठे, हा प्रश्नच आहे. याचाच अर्थ अधिकारी आणि दलालांचे रॅकेट मार्फत पध्दतशीरपणे व्यवसायकराच्या सरकारी रकमेची लूट केली जाते हेच उघड होते, असा आरोप केला. तसेच यात सुधारणा होवून वाहन धारकांना न्याय न दिल्यास वाहनधारकांचे आंदोलन अथवा उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा श्री.मुथा यांनी दिला आहे.