भाजपा ज्येष्ठ नेते सुनील मुथा यांच्या
पुढाकारातुन रुग्णास मिळाला न्याय
डॉक्टरांनी सुचविलेल्या सोनोग्राफी सेंटर मधून सोनोग्राफी न केल्यामुळे डॉक्टर सदर बाळावर उपचार करण्यास नकार देतात त्यावेळी आपली काय अवस्था होईल,याची प्रचिती एका दहा दिवसाच्या बाळाच्या पित्यास अनुभवयास मिळाली आहे.
श्रीरामपूर (प्रतिनिधी) : आपल्या दहा दिवसाच्या बाळाला डॉक्टर सोनोग्राफी सुचवतात, आपण घाई घाईने सोनोग्राफी करून तो रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडे जातो, परंतु डॉक्टरांनी सुचविलेल्या सोनोग्राफी सेंटर मधून सोनोग्राफी न केल्यामुळे डॉक्टर सदर बाळावर उपचार करण्यास नकार देतात त्यावेळी आपली काय अवस्था होईल ? मात्र असाच काहीसा प्रकार बेलापूर येथील एका रुग्णाच्या बाबतीत घडला आहे, श्रीरामपूर येथील एका प्रसिद्ध बालरोग तज्ञाने केवळ बाळाची सोनोग्राफी आपण सुचविलेल्या सोनोग्राफी सेंटर मधून केली नाही म्हणून सदर बाळावर उपचार करण्यास नकार दिला. वैद्यकीय क्षेत्रात चालू असलेली कट प्रॅक्टिस या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना सदर अन्यायग्रस्ताने बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा यांच्या कानावर घातली.
सुनील मुथा यांनी विश्व हिंदू परिषदेचे डॉक्टर दिलीप शिरसाट तसेच ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर संकेत संचेती यांना सदर घटनेची माहिती देऊन रुग्णास न्याय न मिळाल्यास या बाबतीत आपण रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू, असा इशाराही दिला. त्यानंतर वेगाने चक्रे फिरली आणि सदर रुग्णास पुन्हा उपचारासाठी बोलावून त्याच्यावर उपचार करण्यात आले.
श्रीरामपूर शहरातील वैद्यकीय क्षेत्रात काही डॉक्टर आणि सोनोग्राफी सेंटरचे चालक यांचे रॅकेट असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. गरीब लोक पैशाची जमवाजमव करून सोनोग्राफी करतात. परंतु ती सोनोग्राफी ग्राह्य धरली नाही तर परत सोनोग्राफी करण्यासाठी पैसे आणायचे कुठून ? याचाही डॉक्टरांनी विचार करायला हवा.सर्वच डॉक्टर असे करतात असे मुळीच नाही,यात काही डॉक्टर खुप प्रमाणिकतेने आपली सेवा करतात,मात्र काही डॉक्टरांचा सेवेकडे नव्हेतर अक्षरशः मेव्याकडेच अधिक लक्ष लागल्याने असले गैरप्रकार घडतात, रुग्ण हा डॉक्टरांना नेहमी देवाच्या रूपातच बघत असतो. डॉक्टरांनी देखील जनसामान्यांच्या मनातल्या आपल्या या प्रतिमेला तडा जाऊ नये याची पुरेपूर काळजी घ्यायला हवी. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीदवाक्य प्रमाणे सामाजिक बांधिलकी जपून आपला व्यवसाय केल्यास भविष्यात असे संघर्षाचे प्रसंग निर्माण होणारच नाहीत अशी आशाही श्री.मुथा यांनी व्यक्त केली. तरीही भविष्यात रुग्णांवर अशा प्रकारचा अन्याय झाल्यास संबंधित डॉक्टरांविरुद्ध कर्तव्यात कसूर केला म्हणून भा.द.वि कलम १६६ अन्वये कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही सुनील मुथा यांनी दिला आहे.