देवीदास देसाई बेलापुर:
बेलापुरला दुषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारीवरुन बेलापुर ग्रामपंचायतीने बैठक बोलविली अन आजी माजी सदस्य पदाधिकारी, ग्रामस्थ ,कामगार यांच्याकडून समस्येचे निकारण करण्याबाबत चर्चा झाली.अन त्यातून जे धक्कादायक सत्य बाहेर आले ते समजल्यावर "बरे झाले बैठक बोलविली"असेच म्हणावे लागले, गेल्या दोन तीन महीन्यापासुन बेलापुर व परिसराला दुषित पाणी पुरवठा होत होता या बाबत सदस्य भरत साळूंके, रविंद्र खटोड सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले, चंद्रकांत नाईक यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या दुषित पाण्याचे नमुनेही व्हाटस्अप गृपवर फिरले. गांवकरी मंडळाचे मार्गदर्शक शरद नवले यांनी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना तातडीने कारण शोधण्याच्या सूचना दिल्या.यावर उपाय योजना संदर्भात चर्चा करण्यासाठी सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी ग्रामस्थांची बैठक बोलविली. या बैठकीच्या चर्चेतून असे समोर आले की अनेक वर्षापासुन टाकी स्वच्छ केलेली नाही त्यामुळे तातडीने टाकी स्वच्छ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामपंचायतीने तातडीने टाकी स्वच्छ करण्याच्या कामास सुरुवात केली असता भयानक सत्य समोर आले. त्या टाकीत चार ते पाच फुटापर्यत गाळ साचलेला होता अन हेच गाळ मिश्रीत पाणी बेलापुर व परिसरातील नागरीक गेल्या अनेक वर्षांपासून पित होते.त्या टाकीतील बऱ्याच वर्षापासून साचलेला गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात आले असता मागील काळात टाकी केव्हा साफ करण्यात आली होती याची माहीती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता टाकी स्वच्छ केल्याची तारीख महीना वर्षच सापडले नाही या वरुन अनेक वर्षापासून नागरीक गाळ मिश्रीत पाणीच पित होते हे उघड झाले. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजाराचे प्रमाण सर्वात जास्त आहे.हे माहीत आसताना देखील त्याकडे दुर्लक्ष झाले आरोग्य विभागही या बाबत अनभिज्ञ होता पाण्याच्या टाकीत साचलेला प्रचंड गाळ हा वरुन पडलेल्या पाण्यामुळे ढवळून निघत होता व तेच ढवळलेले गाळ मिश्रीत पाणी नागरीकाना पिण्यास येत होते हे या निमित्ताने समोर आले आहे.याबाबत सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले की बैठकीत झालेल्या चर्चे नुसार बेलापूर बु ग्रामपंचायतीच्या वतीने ५ लाख लिटर पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील गाळ काढणे व टाकी स्वच्छ करण्याच्या कामास सुरुवात केली आहे.त्या नंतर २ लाख लिटर ची टाकी देखील गाळ काढून स्वच्छ करण्यात येणार आहे.मेन टाकीवरील पाण्याचे सर्व हौद देखील गाळ काढून स्वच्छ करण्यात येणार आहेत.या आधी अमरधाम, खटकळी-गावठाण,२० घरकुल, अयोध्या कॉलनी येथील पाण्याच्या टाक्या गाळ काढून स्वच्छ करण्यात आल्या आहेत. तसेच सातभाई वस्ती, गायकवाड वस्ती, कुऱ्हे वस्ती, रामगड, सुभाषवाडी येथील टाक्या देखील लवकरच साफ करण्यात येणार आहेत.परिसरात असणाऱ्या सर्वच बारा पाणी साठवण टाक्याची स्वच्छता वेळो वेळी करण्यात यावी व टाकी केव्हा स्वच्छ केली ते टाकीवर तसेच बेलापुर ग्रामपंचायतीच्या नोंदवहीत नोंद केली जावी अशीही नागरीकांची मागणी आहे.