सध्या रिक्त जागांवर बदली
देण्याची संघटनेची मागणी
श्रीरामपूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद शिक्षक जिल्हांतर्गत बदली-२०२२ मध्ये संवर्ग -१ , दिव्यांग शिक्षक कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्यात आला आहे. बदली प्रक्रियेत फक्त बदली प्राप्त शिक्षकांच्या जागेवर अपंग शिक्षकांना बदली मागता येईल. मात्र ज्या सध्या रिक्त जागा आहेत, त्या पदावर बदली मागता येणार नाही, अशी तरतूद शासन निर्णयात करण्यात आल्यामुळे दिव्यांग शिक्षकांवर मोठा अन्याय होणार आहे. तरी शासनाने याबाबत तातडीने लक्ष घालून दिव्यांग शिक्षकांना रिक्त जागा वरून बदली देण्याचा हक्क द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव अनाप यांनी केली आहे.
सुधारित बदलीधोरण शासन निर्णय ७ एप्रिल२०२१ नुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ च्या बदली धोरण अंमलबजावणी टप्पा क्र.४.२ मधील मुद्दा क्रमांक.४.२.६ नुसार संवर्ग-१ मधील शिक्षकांना बदली प्राप्त शिक्षकांच्या उपलब्ध जागा नुसार प्राधान्यक्रमानुसार बदली देण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.
वरील नमूद मुद्द्याअनुरूप संवर्ग-१ मधील दिव्यांगांना प्राधान्यक्रम निवडताना संवर्ग-१ च्या बदली वेळी फक्त बदली प्राप्त शिक्षकांच्या जागा निवडण्याचा मर्यादित अधिकार ठेऊन अन्यायकारक असा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे .त्यामुळे सदरील दिव्यांग शिक्षकांची सोयीच्या ठिकाणी बदली न होता, गैरसोयीच्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता अधिक आहे.त्यामुळे संवर्ग-१ मधील दिव्यांग शिक्षकांना संवर्ग-१ च्या बदली वेळी उपलब्ध असलेल्या ,पदोन्नती, सेवानिवृत्ती, व अन्य कारणास्तव निव्वळ रिक्त जागा आणि बदली प्राप्त शिक्षकांच्या जागा अशा दोन्हीही उपलब्ध जागांमधून पसंती क्रम देण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून त्यांची सोयीच्या ठिकाणी बदली होण्याची अधिक प्रमाणात शक्यता निर्माण होईल आणि दिव्यांगांना सोयीच्या ठिकाणी बदली मिळण्यास निश्चितच अन्याय होणार नाही.
संवर्ग-१ मधील दिव्यांगांना बदली प्राप्त शिक्षकांच्या आणि संवर्ग-१ च्या बदली वेळी उपलब्ध असलेल्या रिक्त ठेवायच्या जागा सोडून सर्व निव्वळ रिक्त जागा निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येऊन संवर्ग-१ मधील दिव्यांगांवर होत असलेला अन्याय दूर करून न्याय देण्यात यावा, ही मागणी मान्य न झाल्यास संघटनेच्या वतीने राज्य पातळीवर तीव्र आंदोलन छेडले जाईल.अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ मधील तरतुदींनुसार दिव्यांग शिक्षक बदलीसाठी सुयोग्य प्रशासनाने विशेष विनाअट बदली धोरण ठरवावे, अशी मागणी श्री साहेबराव अनाप यांनी केली आहे .या निवेदनावर संघटनेचे मार्गदर्शक दत्तात्रय जपे, सचिव पोपट धामणे, कार्याध्यक्ष राजू आव्हाड, राज्य संचालक संतोष सरवदे, कोषाध्यक्ष राजेंद्र औटी, उद्धव थोरात, बन्सी गुंड,विजय राऊत, किरण माने, राजेंद्र ठुबे, दादासाहेब गव्हाणे, संजय बोरसे, सचिन रनाते, संजय हरकळ, खंडू बाचकर, रमेश शिंदे , सुनील गवळी, सुखदेव ढवळे ,दत्तू फुंदे, सूर्यभान वडीतके, बाबासाहेब बोरसे, अनिल घोलप ,अनिल ओहोळ, श्रीकांत दळवी, दत्तात्रय दिघे, भाऊराव नागरे, भीमराज चव्हाण सर आदींनी केली आहे.