शेतकरी चिंताग्रस्त,शेती पिकांची
मोठ्या प्रमाणात दानादान !!
राहाता समीर बेग अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश भागात गुरुवार आणि शुक्रवार जोरदार मुसळधार पावसाच्या हजेरीमुळे काढणीस आलेल्या सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी शेतकरी चिंतेत आहेत.यंदा पेरणीनंतर पावसाने मोठा खंड दिला. त्यामुळे पिकांची उगवण क्षमता कमी झाली. त्यातून जे पीक वाचले त्याला नंतर अतिवृष्टीचा फटका बसला. या दोन्ही संकटातून थोडेफार पीक हाती आले होते. त्यातून काही प्रमाणात लागवड खर्च निघून नुकसान कमी होईल, अशी आशा होती. परंतू ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाचा पुन्हा एकदा या पिकांना मोठा फटका बसला आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून त्याची गंजी शेतात लावून ठेवली होती त्या शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाला झाकताना मोठी तारांबळ उडाली. अनेकांच्या पिकात पाणी साचल्याने आता सोयाबीन काढणीस अडथळा आला आहे. परिणामी, शेतकरी चिंतेत आहेत. शेंगांना कोंब फुटण्याची भीती आहे,कारण सोयाबीनच्या शेंगा वाळल्या आहेत.काहींना मजुरा अभावी सोयाबीन पीक काढता आले नाही. त्यामुळे अद्यापही शेतातच असलेल्या वाळलेल्या सोयाबीन शेगांना या पावसामुळे कोंब फुटू शकतात. तसे झाले तर काहीच पीक हातात येणार नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.अचानक आलेल्या पावसामुळे काहीवेळ शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. भाजीपाला विक्रेते, पथारीवाले यांची चांगलीच तारांबळ उडाली. ग्रामीण भागात शेतीच्या कामांना व्यत्यय आला.परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने कापूस, सोयाबीनसह भाजीपाला व फळबागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिसरात वादळी वारा व मेघगर्जनेसह अधुनमधून पाऊस पडतच आहे,शेतात सोयाबीनची काढणी सुरू असल्याने मोठी तारांबळ उडाली आहे. विजेचा लखलखाट व मोठ्या प्रमाणात मेघगर्जनेसह पावसामुळे भीतीदायक वातावरण झाले होते. शेतातील काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंज्यांमध्ये पाणी घुसले. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने कापूस पीकही लवंडले. भाजीपाला व फळबागेचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. परिसरात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या प्रवासात पावसाने हाहाकार केल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, महसूल प्रशासनाने तात्काळ जलद पावले उचलत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिक नुकसानीचे त्वरित पंचनामे करत शासनाकडे पाठवावेत ज्यामुळे किमान नुकसान भरपाई पोटी जे काही मिळेल त्यावरच दिवाळी साजरी करता येणार असल्याची शेतकऱ्यांकडून मागणी होते आहे.