श्रीरामपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यातील ख्यातनाम मराठी साहित्य समीक्षक, पुरोगामी विचारवंत माजी प्राचार्य डॉ. प्रकाश पुंडलिक कुंभार यांची मॉरिशस येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विचार संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्रीरामपूर साहित्यिकांतर्फे त्यांचा अभिनंदनपूर्वक सन्मान करण्यात आला .फुले, शाहू,आंबेडकर विचार प्रसारक मंडळाकडून दरवर्षी असे संमेलन आयोजित करण्यात येते.
असे आंतरराष्ट्रीय विचार संमेलन दिनांक २५ ते ३० सप्टेंबर २०२२ रोजी मॉरिशस येथे आयोजित करण्यात आलेले आहे. त्या प्रतिष्ठित विचार संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील माजी प्राचार्य डॉ.प्रकाश कुंभार यांची निवड होणे ही मराठी भाषा,संस्कृती, माणूस आणि मायभूमीसाठी गौरवास्पद निवड असल्याचे मत श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले,ऍड.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन आणि वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे मुख्य सल्लागार माजी प्राचार्य टी. ई. शेळके, उपाध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे, कवयित्री संगीता फासाटे, सदस्य अशोकराव कटारे, कोषाध्यक्ष सौ. मंदाकिनी उपाध्ये, कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये, साहित्य प्रबोधन मंचचे अध्यक्ष डॉ. शिवाजी काळे, कार्याध्यक्ष स्वामीराज कुलथे,विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे,राजमाईन्ड पॉवर पब्लिकेशनचे प्रवर्तक डॉ. रामकृष्ण जगताप,साहित्य परिवार संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष प्रा.कवी पोपटराव पटारे, सचिव सौ.सुनीताताई पटारे, स्नेहप्रकाश प्रकाशनच्या प्रकाशिका सौ. स्नेहलता कुलथे,आसरा प्रकाशनच्या प्रकाशिका सौ.मोहिनी काळे, राजमाईन्ड पॉवर पब्लिकेशनच्या प्रकाशिका सौ. उज्ज्वलाताई जगताप आदिंनी डॉ. प्रकाश कुंभार यांच्या निवडीचे कौतुक केले. महाराष्ट्र भूमीचा, मायमराठीचा हा गौरव आहे. डॉ. प्रकाश कुंभार यांचे जीवन व साहित्यकार्य प्रेरणादायी आहे. २० फेब्रुवारी १९५३ ला जन्मलेले प्राचार्य डॉ. कुंभार यांनी बी. ए. (ऑनर्स ), पीएच. डी. पर्यंत परिश्रमाने शिक्षण घेतले. सांगली जिल्ह्यातील,पलूस तालुक्यातील कुंडल हे त्यांचे मूळ गाव होय. प्रारंभी त्यांनी प्राथमिक, माध्यमिक विभागात नोकरी केली. महाविद्यालयीन विभागात त्यांनी ३४ वर्षे अध्यापन केले. चंदगड तालुक्यातील कोवाड येथील कला,विज्ञान महाविद्यालयात प्राचार्यपदी भरीव शैक्षणिक कार्य केले. भाषाविज्ञान या विषयात त्यांनी लेखन, अध्यापन,संवादरुपी प्रभावी भूमिका बजावली. भाषाशास्र, दलित,ग्रामीण, लोकगीते, कुंभारसमाज इतिहास, धनगरी ओव्या,लोकनाट्य,संतसाहित्य, उपयोजित भाषाविज्ञान, मराठी साहित्य अवकाशातील संदर्भ, अनेक संशोधन प्रकल्प असे त्यांनी दर्जेदार लेखन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २८ विद्यार्थी पीएच. डी. तर २५ विद्यार्थी एम. फिल झाले.त्यांनी अनेक साहित्य, शासकीय, विविध मंडळे, विद्यापीठ समितीवर कार्य केले. त्यांच्या अपूर्व योगदानामुळेच त्यांची झालेली निवड ही सार्थ असल्याचे डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सांगितले.