श्रीरामपूर (प्रतिनिधी) : भारतीय राज्यघटनेत देशातील सर्व नागरिकांना समान अधिकार देताना कुठेही स्त्री किंवा पुरुष असा उल्लेख केलेला नाही. आम्ही या देशाचे नागरिक असतानाही आम्हाला समाजात मानाचं स्थान दिलं जात नसताना आमच्या हस्ते ध्वजारोहण करून दिलेला सन्मान अविस्मरणीय असल्याचे तृतीयपंथी कार्यकर्ती कवियत्री व लेखिका दिशा पिंकी शेख यांनी प्राईड अँकेडमी येथे बोलताना व्यक्त केले.
यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार बरकतअली शेख, तृतीयपंथी आशु शेख, शाळेचे शिक्षक,पालक उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना शेख बरकतअली म्हणाले की,माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक माऊली मुरकुटे यांनी भगीरथ प्रयत्नाने ज्ञान गंगा ग्रामीण भागात स्थापित केली.
डॉ.मुरकुटे ह्या हाडाची शिक्षिका असून पंचक्रोशी दर्जेदार शिक्षण देण्याचा वसा त्यांनी घेतला आहे.
आपल्या समाजाचाच भाग असलेल्या तृतीयपंथीयांना आज २१ व्या शतकातही उपेक्षेचे, अवहेलनेचेच जगणे जगावे लागत आहे. जमेची बाब म्हणजे कायद्याने तरी त्यांची बाजू उचलून धरायला सुरुवात केली आहे.
कुणाच्या घरी बाळ जन्माला आलं, कोणी नवीन व्यवसाय सुरू केला किंवा कोणाच्या घरी विवाह समारंभ अथवा अन्य मोठा सामाजिक समारंभ असेल, तरच आपल्या समाजाला तृतीयपंथीयांची आठवण येते. पण तृतीयपंथी हे समाजाचाच भाग आहेत, याचा कधीच सखोलपणे विचार केला जात नाही. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं आवश्यक आहे. तृतीयपंथीयांना आजही वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जावे लागते. तृतीयपंथीयांच्या क्षमतेवर विश्वास ठेवला जात नाही, त्यांचा कुठल्याच स्तरावर स्वीकार केला जात नाही, माणूस म्हणून मनाप्रमाणे जगू दिलं जात नाही. शिक्षणाच्या हक्कापासूनदेखील ते वंचित आहेत, आपली ओळख सांगताना त्यांना केवळ नाव पुरेसं ठरत, नाही तर सोबत जात, धर्म, कुटुंब यांचे दाखले जोडावे लागतात. परंतु कुटुंबानेच बेदखल केल्यानंतर पुरावे आणणार कुठून ? हा प्रश्न समोर उभा राहतो. ज्यामुळे ते समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होऊ शकत नाहीत. या सर्व परिस्थितीमुळे आजही त्यांच्यासाठी रोजचं जिणं संघर्षमयच आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील तृतीयपंथीयांच्या समस्या आणि संघर्ष वेगळा आहे. त्याचा सखोल अभ्यास होण्याची आणि धोरण बनवताना स्वतंत्रपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. असे मत प्राईडच्या संस्थापिका सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे यांनी व्यक्त केले
याप्रसंगी चिमकुल्या विध्यार्थ्यांनी विविध कलागुण व मनोगते व्यक्त केले.प्राईड स्कुल व कॉलेज प्राचार्या सौ.गोटे यांनी प्रास्ताविक केले. टाकळीभान प्राईड शाळेचे मुख्याध्यापक प्रा.घोगरे यांनी आभार मानले.