श्रीरामपूर (वार्ताहर) : विद्यार्थी हा ज्ञानार्थी असला पाहिजे.त्याने भरपूर वाचन केले पाहिजे, त्यासाठी साहित्य आणि साहित्यिक यांची जवळीक साधा म्हणजे संस्कृती कळेल. मातृभाषेत प्राविण्य मिळविले तरच कोणतीही परकीय भाषा लवकर आत्मसात करता येते, असे मत येवला येथील जेष्ठ मराठी साहित्यिक प्रा. गो. तु. पाटील यांनी व्यक्त केले.
येथील ॲड. रावसाहेब शिंदे शैक्षणिक संकुलामध्ये आयोजित 'साहित्यिक आपल्या भेटीला 'कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. गो. तु. पाटील बोलत होते.डॉ.राजीव शिंदे आणि डॉ. प्रेरणा शिंदे यांच्या प्रेरणेतून आयोजित केलेल्या या कर्यक्रमात प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांनी पाहुण्यांचा सन्मान करून प्रतिष्ठानच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला.साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी प्रा. गो. तु. पाटील यांचा साहित्यिक परिचय करून दिला.मराठी साहित्य विश्वातील अभिजात भाषिक दर्जा असलेले 'अनुष्टुभ'मासिकाचे तज्ज्ञ संपादक, 'ओल अंतरीची'आत्मचरित्रकार आणि अनेक समीक्षात्मक पुस्तके प्रसिद्ध असणारे प्रा.गो.तु. पाटील ॲड.रावसाहेब शिंदे यांचे अत्यन्त निकटवर्तीय आहेत, असे सांगून डॉ. उपाध्ये यांनी साहित्य आणि साहित्यिक यांचे मोठेपण विशद केले.प्रा. गो. तु. पाटील यांनी ॲड.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानची प्रगती पाहून आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, विद्यानिकेतनसारखे आदर्श शिक्षणसंस्कारकेंद्र मोठया दिमाखाने उभे राहिण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि ते पूर्ण झाले.ॲड.रावसाहेब शिंदे त्वत्तनिष्ठ आणि ज्ञाननिष्ठ व्यक्तिमत्व होते. त्यांचे मराठी भाषा, संस्कृती आणि माणुसकीवर प्रेम होते.साहित्य ही त्यांची जीवनज्योत होती.जन्म -जीवन-मृत्यू ही अपरिहार्य प्रणाली आहे, लेखक त्यावर अधिक प्रकाश टाकतो, त्यासाठी त्यांनी महाभारतातील शेवटच्या पांडव मृत्यूपर्वातील प्रसंग सांगितले.प्राचार्या सौ. रंजना जरे यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली.वर्षा धामोरे,भारती कुदळे यांनी आपापल्या वर्गातर्फे स्वागत केले.सुखदेव सुकळे यांनी 'समर्पित आदर्श 'हे चरित्र पुस्तक, बुके देऊन प्रा.पाटील यांचा सत्कार केला. प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी विद्यानिकेतन स्कुलचे महत्व सांगितले. विजय रणदिवे, गणेश चोथे, गोविंद बच्छाव, संजय खेमनर, गणेश कसबे आदी शिक्षकांनी नियोजन केले. प्राचार्य विनोद रोहमारे यांनी आभार मानले.