चिखली तालुक्यातील विहिरींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करून नुकसान भरपाई द्या- प्रशांत पाटील
चिखली प्रतिनिधी:
चिखली तालुक्यातील विहिरींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करून नुकसान भरपाई देण्याची मागणी रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी कृषिमंत्री अब्दुल सतार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी त्यांनी असेही म्हटले आहे की,बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात
चार वर्षांत तब्बल ७५० विहिरी खचलेल्या असून सदर दुरुस्तीसाठी सरकारकडे प्रस्ताव सादर केलेले आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे २०१९ ते २०२२ या चार वर्षांच्या काळात चिखली तालुक्यातील ७५० शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या असून खचलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी आर्थिक साह्य करण्याचा नियम असताना मा.जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर या खचलेल्या विहिरींचे प्रस्ताव पाठवून देखील दुरुस्तीसंदर्भात कोणतीही मंजुरी अद्यापर्यंत देण्यात आलेली नाही.
लाखो रुपये खर्चून शेतकऱ्यांनी सिंचनासाठी विहिरी खोदल्या आहेत पाणी नाहीच लागले तर विहीर खोदाईवर केलेला खर्चही वाया जातो,पाण्याची सोय व्हावी म्हणून हा जुगारही शेतकरी निसर्गाशी खेळत असतो, उत्पन्नवाढीसाठी शेतकरी दिवसरात्र राबतो परंतु ऐन हातातोंडाशी आलेला घास लहरी निसर्ग हिरावून घेतो,विहीर खोदायची म्हटल्या तर किमान ५ लाख रुपये बांधकामासह लागतात, २०१९ ते २०२० दरम्यान तालुक्यातील तब्बल ७५० विहिरी अतिवृष्टीमुळे खचल्या असून तशी नोंद शासन दप्तरी आहे,तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, कृषीसेवकांनी तसे पंचनामे केलेले आहेत,तालुक्यातील ७५० शेतकऱ्यांच्या विहीर दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून २०२२ ला जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे,२०१९ चा प्रस्तावदेखील याच तारखेत पाठविण्यात आलेले आहेत अद्यापही कोणत्याच प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारकडे निधी नाही काय? असा सवाल नुकसानग्रस्त शेतकरी करू लागले आहेत.
नवीनला अनुदान; खचलेल्या विहिरींना का नाही?
सिंचनाकरिता नवीन विहीर खोदकामासाठी शासनाने नुकतीच चार लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे मात्र ज्या शेतकऱ्यांनी स्वकष्टाने चार ते पाच लाख रुपये खर्च करून विहीर खोदली, पण अतिवृष्टीत तीच विहीर खचली, त्याला अनुदान देण्याची तसदी शासकीय यंत्रणेने आजवर घेतली नाही.
विहीर खचल्यानंतर दुरुस्तीसाठी लागणारा खर्च आवाक्याबाहेर असल्यामुळे शासकीय मदतीशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही, शासनाची मदत मिळेल या आशेवर असलेला शेतकरी विहिरीची दुरुस्ती करू शकत नाही,त्यामुळे विहीर जवळपास पडिक पडते,त्यावरील सिंचन पूर्णपणे बंद होते,शेतकरी खरिपानंतर रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांपासून वंचित राहिला आहे.
२०१९ चे १५३ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
२०१९ ला झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यातील जवळपास ७ मंडळातील १५३ विहिरी खचल्या आहेत त्या प्रस्तावांवर अद्यापही काहीच विचार करण्यात आला नसून तालुक्यातील धोडप मंडळात १५ विहिरींचे नुकसान झाले. उदयनगर मंडळात ९, मेरा खुर्द ८, एकलारा १४, चांधई १३, चिखली २६ व अमडापूर मंडळात सर्वाधिक ६८ विहिरी खचून शेतकऱ्यांची मोठी हानी झाली. २०१९ सालच्या विहिरींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव शासन, प्रशासन दरबारी रखडून पडले आहेत, तरी तात्काळ प्रस्ताव मंजूर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दयावी अन्यथा रयत क्रांती पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी दिला आहे.