कविवर्य नवनाथ रणखांबे यांच्या 'प्रेम उठाव' या काव्य आविष्काराचं बाह्यरंग (मुखपृष्ठ) अगदीच उठावदार आहे सतीश खोत या चित्रकारांनी ते चित्रित केलेलं आहे. निळ्या रंगाची भूमी (बॅकग्राऊंड) म्हणजेच निळ्या रंगाचं आकाश निळ्या रंगाची शाई कवी मनाला दर्शवायची आहे. बरं हा निळा रंग पावसाळी नभाचा आहे हं !, म्हणजेच कवितांना अल्हाददायक पावसाळी गारवा असावा हे मुखपृष्ठ पाहताना जाणवलं व आतील कवितांचा आस्वाद घेतानाही हा तर्क खरा ठरला. आतील कवितांमधील शांतता, बंधने, शिक्षणाची कास, प्रेमाच्या भावना... मुखपृष्ठावर उमटलेलं आहे. हा उठाव उद्रेक करणारा नाहीय त्यामुळेच शांततेचं प्रतीक असणारा पांढरा रंग, पांढरं कबूतर दर्शवलेलं आहे. व प्रेम हा शब्द परंपरेनुसार साजिऱ्या अशा गुलाबी रंगात आहे. बाह्यचित्ररूप विश्व आणि आतील शब्दरूप चित्र यांचा अनोखा आविष्कार म्हणजे नवनाथ रणखांबे यांच्या कवी मनाच्या भावनांचा आरसाच आहे. प्रा.डॉ. विठ्ठल शिंदे यांनी मलपृष्ठावर म्हटले आहे 'प्रेमात चिंब भिजल्या मनाचा मुक्त विहार' यांच्या या शब्दांवरून उमगतं की शिंदे सरांनी किती जीव ओतून कवितेचा आस्वाद घेतला आहे.
कवींच्या प्रेमकविता विरह, जखम,फसवा डाव टाकण्याची भीती, मिलनाचा आनंद, तृप्तपणा, बेधुंदी, उदासीनता , कुठेतरी हरवलेलं प्रेम, खोल अंतकरणात जपण्याची वृत्ती दिसून तर येथेच पण फक्त दिसून येत नाही तर ती जाणवते. कवींचे शब्द फक्त दिसत नाहीत तर ते जाणवतात हेच त्या कलाकृतीचे यश असतं त्यामुळे या प्रेम कविता माझ्या दृष्टीने एक आस्वादक म्हणून यशस्वी आहेत. कमीत कमी शब्द पण जास्तीत जास्त भावनाविष्कार हा या कवितांचा गाभा आहे.
संपूर्ण सृष्टी प्रेमाची भुकेली आहे तरीही समाजाची बंधने प्रेमात आड येतात हे वास्तव साखळदंडाने मुखपृष्ठावर दर्शवलेलं असलं तरी कवींची कविता मुक्तविहार करणारी आहे. 'दुःखालाही कापणारी' कणखर आई कवींनी 'आभाळ होताना माय' या कवितेत शब्दरूपाने रेखाटली आहे, यात फक्त आईचं वर्णन नाहीये तर लांडग्यांची क्रूरताही दर्शवलेली आहे. हो लांडगेच !
प्रज्ञावंत मळा फुलवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रतीचा कृतार्थ भाव कवीमनाच्या शब्दाशब्दातून ओसंडून वाहतो.(प्रज्ञावंत मळा हा कवींचा शब्द आहे.) . इंग्रजांच्या जुलूमापेक्षाही भेदक असा जातीभेद नष्ट करणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेबांविषयीचा आदरभाव उल्लेखनीय आहे कारण त्यांच्या कवितेत बाबासाहेबांप्रतीचा आदर भक्तीसहित आलेला जाणवतो.
कवी स्वतःला अजिंक्य रणसम्राट म्हणत आहेत, तरी त्यांच्या कवितांना संतापाचा सूर नाही किंवा त्यांना कोणाशी स्पर्धा करायची नाही कारण त्यांनी स्वतःला सम्राट म्हटले राजा नाही हे विचारात घेण्यासारखं आहे. फक्त प्रियकर -प्रेयसीचं प्रेम दर्शवणं नाही तर स्वतःवर प्रेम करायलासुद्धा शिकवणारी त्यांची कवीता आहे
'प्रेम उठाव' हा कवितासंग्रह झेप घेऊ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नक्कीच आत्मविश्वास देतोय कारण यात आंबेडकरांचा आदर्श ,आईची कणखरता, समतेचा सूर, बाईच्या वाट्याला येणारी जखम आणि प्रेमाची कोमलता सुद्धा आहे. बाईच्या वाट्याला येणाऱ्या जखमा सुद्धा कवीमनाला टोचत आहेत.
कवी 'नवनाथ' यांच्या नावाप्रमाणेच त्यांच्या कवितांना 'नाथा'ची म्हणजेच रक्षणाची आस आहे. कवींची लेखणी सरळ साधी सोपी आहे. वृत्त, छंद हे माझ्या दृष्टिने आव्हान असणारे काव्यप्रकार कवींनी लिलया पेलले आहेत. हा काव्यसंग्रह प्रेमवायू देणारा वटवृक्ष ठरेल असं मला आस्वादक म्हणून जाणवते. कवींच्या हृदयस्पर्शी कलाविष्काराला अनेक शुभेच्छा !
समीक्षा -: कु. श्रृती रसाळ
मालाड- मुंबई ४०००९५
भ्रमणध्वनी : ९८३३२०८४५३
पुस्तक -: प्रेम उठाव
कवी -: नवनाथ रणखांबे
भ्रमणध्वनी : ९९६७४३५०३२
प्रकाशन -: शारदा प्रकाशन ठाणे
किंमत -: ९०/- ₹
वृत्त संकलन: शौकतभाई शेख, श्रीरामपूर