श्रीरामपुर (प्रतिनिधी) : बीड शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा आहे. या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली. हा प्रकार सकाळी तेथील वीरशैव समाजाताील काही युवकांच्या निदर्शनास आला असल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली.
गेल्या महिनाभरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळळ्याची विटंबना होण्याची ही दुसरी घटना आहे. या प्रकरणी वीरशैव समाजाच्यावतीने निषेध नोंदवत पेठबीड पोलिसांना निवेदन देण्यात आले.
दरवेळी प्रशासनाकडून समाजकंटकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र आता नुसते आश्वासन नको तर समाजकंटकांवर कडक कारवाईच करा असा आक्रमक पावित्रा वीरशैव समाज बांधवांनी घेतला आहे.
बाराव्या शतकातील थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांनी जगाला समता, न्याय, बंधूता, मानवतेचा संदेश दिला. अशा थोर महापुरुषांचा अर्धाकृती पुतळा बीड शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात नगरपालिकेने सन २००९ मध्ये स्थापन करत वीरशैव समाज व बहुजन समाज बांधवांच्या भावनांचा आदर केला. दरवर्षी या ठिकाणी महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली जाते.महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याजवळ नगर पालिकेचे गार्डन आहे. या गार्डनमध्ये परिसरातील लहान मुले, पुरुष विरंगुळ्यासाठी येतात. परंतु रात्रीच्या वेळी या ठिकाणी समाजकंटक तसेच मद्यपींचा वावर असतो. अशा समाजकंटकांकडून महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. पुतळ्याची स्थापना झाल्यापासून चबुतर्याची फर्शी काढणे, लोखंडी ग्रील तोडणे, लघुशंका करणे असे प्रकार करुन पुतळ्याचा अवमान केला जात आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वीही अशीच घटना या ठिकाणी घडली आणि सोमवारी पुन्हा दुसर्यांदा ही घटना उघडकीस आली. गेेल्या महिनाभरात दोन वेळेस समाजकंटकांनी महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे. यामुळे वीरशैव व बहुजन समाज बांधवांच्या भावना दुखावल्या असून संताप व्यक्त होत आहे. महापुरुषांचा वारंवार अवमान करणार्यांना जेरबंद करा, यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याजवळ सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी, पुतळ्याच्या चबुतर्याच्या फरशी व लोखंडची तोडफोड झाल्याने पुतळ्याचे पुन्हा नव्याने सुशोभिकरण करावे अशी मागणी वीरशैव समाज बांधवांनी केली आहे. यापूर्वी विटंबना झाल्यावर प्रशासनाला निवेदन देऊन केवळ आश्वासन मिळाले. मात्र यंदा आश्वासन नको, समाजकंटकांवर थेट कारवाई करुन त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा असा आक्रमक पावित्रा वीरशैव समाज बांधवांनी घेतला आहे.
तसेच राज्यभरातून या घटनेचा तिव्र निषेध होत असुन श्रीरामपूर शहरातील विरशैव लिंगायत समाज आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय नगरकर यांनी देखील अशा समाजकंटकांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे.