श्रीरामपूर (प्रतिनिधी) : साहित्यिक हा समाजाचा संस्कृतीदर्शक असतो.प्रत्येक माणसात लेखक दडलेला असतो. लेखक आभाळातून पडत नाही तर तो अनुभवातून आकाराला येतो.हातात लेखणी आणि मनात उर्मी असेल तर त्यातून कोणतीही व्यक्ती लेखक बनते.असे विचार येवला येथील अनुष्टुभ मासिकाचे संपादक, प्रख्यात साहित्यिक, समीक्षक,सेवानिवृत्त प्रा. गो.तु. पाटील यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील मार्केट यार्ड शिवाजीनगर भागातील शेळके सभागृहात आयोजित लेखक आणि साहित्यनिर्मिती विषयावर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. गो. तु. पाटील बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी.ई.शेळके होते. प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक केले.माजी प्राचार्य डॉ.शन्करराव गागरे,डॉ. संजय शेळके, डॉ अर्चना शेळके, प्रा.शिवाजीराव बारगळ, सागर राजभोज आदी उपस्थित होते.यावेळी डॉ.बाबुराव उपाध्ये लिखित 'साहित्यशोध', 'समाजचिंतन ', 'मातृपितृ देवोभव', ' डॉ.बाबुराव उपाध्ये गौरवग्रन्थ असलेले 'साहित्यशिल्प,' साहित्यस्नेह प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे लिखित 'झेप तुळशीरामाची 'आदी पुस्तके देऊन प्रा.गो. तु.पाटील यांचा सत्कार केला. आपल्या मनोगतात ते पुढे म्हणाले,डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी अतिशय परिश्रमाने आयुष्य घडवत लेखन केले.पुणे येथील डॉ.स्नेहल तावरे यांनी स्नेहवर्धन प्रकाशनतर्फे डॉ. उपाध्ये यांची पुस्तके छापून त्यांचा दर्जेदार लेखनाला प्रकाश दिला.प्राचार्य डॉ.शन्करराव गागरे यांनी 'झेप तुळशीरामाची 'तसेच 'आनंदयात्री 'या पुस्तकातून प्राचार्य शेळके यांचे सेवाभावी चरित्र आणि चारित्र्य दिशादर्शक आहे. डॉ.स्नेहल तावरे, प्राचार्य डॉ.लक्ष्मणराव भोर, कवी प्रा.पोपटराव पटारे यांच्याशी दूरदर्शी माध्यमातून संवाद साधताना म्हणाले, डॉ.तावरे ह्या मराठी भाषा आणि संस्कृतीला अभिजात दर्जा देत आहेत, प्राचार्य डॉ. भोर हे मोखाडासारख्या ठिकाणी मनापासून कार्य करीत आहेत. कवी पोपटराव पटारे यांना म्हणाले, शेतकरी कवी हा ग्रामीण भागातील मुक्या मनाला बोलता करणारा संवेदनशील प्रतिनिधी आहे. प्राचार्य शेळके, प्राचार्य डॉ. गागरे यांनी मनोगत व्यक्त केले.डॉ. संजय शेळके, डॉ. अर्चना शेळके,सागर राजभोज यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.प्रा.शिवाजीराव बारगळ यांनी आभार मानले.